बीडच्या केजमधून कोट्यवधीचे चंदन जप्त, चंदनचोरी मागे कोण?; पोलिसांचा शोध सुरू

| Updated on: May 05, 2024 | 11:33 PM

बीड जिल्ह्यात लोकसभेची निवडणुकीचं रण माजलं आहे. या निवडणुकीत अनेक आरोपप्रत्यारोप सुरू झाले आहेत. त्यातच आता चंदनचा मोठा साठा सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

बीडच्या केजमधून कोट्यवधीचे चंदन जप्त, चंदनचोरी मागे कोण?; पोलिसांचा शोध सुरू
Beed News
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

बीडच्या केज पोलिसांना अत्यंत मोठं यश आलं आहे. पोलिसांनी चंदनाची वाहतूक करणारा टेम्पो पकडला आहे. या टेम्पोमधून एकूण 2 कोटी 18 लाख रुपयांच्या चंदनची चोरटी वाहतूक केली जात होती. सव्वा टन चंदन या टेम्पोतून नेलं जात होतं. पोलिसांनी टेम्पो चालकाला अटक केली आहे. पोलिसांच्या तपासात हे चंदन बालाजी जाधव यांचे असल्याचं सांगितलं जात आहे. बालाजी जाधव हे नगरसेवक असल्याची माहिती मिळत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी जप्त केलेले चंदन आणि टेम्पो सध्या केज पोलिसांच्या ताब्यात आहे. याप्रकरणी प्रकरणी वन अधिनियम आणि भारतीय दंड विधानानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी पुढील तपास केला जाईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी दिली आहे. बालाजी जाधव हा केज नगर पंचायतमध्ये नगरसेवक आहे. जाधव हा शरद पवार गटाचा नगरसेवक असल्याचं सांगितलं जातं. जाधव हा महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारात सक्रिय असल्याचंही सांगितलं जातं. मात्र, याबाबत बालाजी जाधव यांच्याकडून कोणताही खुलासा आलेला नाही.

1250 किलो चंदन जप्त

पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना या चंदन तस्करीची माहिती मिळताच सिनेस्टाईल सापळा रचून 1250 किलो चंदन जप्त करण्यात आलं आहे. या चंदनाची बाजारात दोन कोटींची किंमत आहे. या कारवाईत दोन चंदन तस्करांना अटक करण्यात आली आहे. एक आयशर टेम्पो चंदन घेऊन केजकडून धारूरकडे जाणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पहाटे पहाटेच ही कारवाई करण्यात आली. पोलिसांना या टेम्पोत 60 गोण्या चंदन आढळून आल्याचं सांगितलं जात आहे.

निवडणुकीच्या धामधुमीत खळबळ

बीड जिल्ह्यात लोकसभेची निवडणुकीचं रण माजलं आहे. या निवडणुकीत अनेक आरोपप्रत्यारोप सुरू झाले आहेत. त्यातच आता चंदनचा मोठा साठा सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या चंदनचा स्थानिक नगरसेवकाशी संबंध असल्याचं सांगितलं जात असल्याने राजकीय वातावरण अधिकच तापलं आहे. सत्ताधाऱ्यांच्या हाती आयतंच कोलीत मिळाल्याने विरोधकांची पाचावर धारण बसली असल्याचं सांगितलं जात आहे. या मुद्द्यावरून आता बीडमध्ये राजकीय वातावरण तापण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.