मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. 31 डिसेंबरला वाल्मिक कराड पोलिसांना शरण आला. पण मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह तीन जण फरार होते. त्यातल्या दोन आरोपींना पकडण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. पोलिसांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतरच या आरोपींना कशी आणि कुठून अटक झाली? त्या बद्दल माहिती मिळेल. या प्रकरणातील दोन आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक केल्याची माहिती आहे. पण कृष्णा आंधळे अजून फरार आहे. दरम्यान या दोन मुख्य आरोपींसह त्यांना मदत करणाऱ्या आणि टीप देणाऱ्यांना सुद्धा पोलिसांनी अटक केली आहे.
संतोष देशमुख यांच्या लोकेशनची माहिती देणाऱ्या सिद्धार्थ सोनावणेला मुंबईतून ताब्यात घेण्यात आलं आहे. त्याचवेळी आरोपींना पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या डॉ. संभाजी वायबसे यांना अटक करण्यात आली आहे. सुदर्शन घुले आणि इतर आरोपीना पळवून लावण्यात संभाजी वायबसेची महत्वाची भूमिका होती. डॉ संभाजी वायबसे यानेच पळून जाण्यात मदत केल्याच समोर आलं आहे. वायबसेच्या कसून चौकशीनंतरच आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला अटक करण्यात आली. 3 आरोपी गेल्या काही दिवसांपासून फरार होते. दोन्ही आरोपींना बसवराज तेली यांच्या विशेष तपास पथकाकडे सोपवण्यात आलं आहे.
पोलीस यंत्रणेवर मोठा दबाव
संतोष देशमुख हत्या प्रकरणात लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी राज्यभरात मोर्चे निघत आहेत. राज्य सरकार आणि पोलीस यंत्रणेवर मोठा दबाव आहे. वाल्मिक कराड हाच या प्रकरणात मुख्य मास्टरमाइंड असल्याचा आरोप होत आहे. वाल्मिक कराड हा राज्य सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. बीड जिल्ह्याच्या राजकारणात वरदहस्त असल्यामुळे वाल्मिक कराडचा प्रभाव असल्याची चर्चा होते. म्हणून चौकशी पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होत आहे.
पुण्यातच सगळे का सापडतात?
“जर त्यांनी, आरोपींना पकडलं असेल तर त्यांचं कौतुक आहे. मात्र त्यांचा मास्टरमाईंड यात आला पाहिजे. याचं सगळं कनेक्शन पुण्यातच का आहे? पुण्यातच सगळे का सापडतात? काय इथे अड्डा आहे का ? एवढे दिवस ते कुठे होते हे पोलिसांना माहिती नाही” अशी टीका बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी केली.