भोपाळ : जमिनीचा तुकडा, दोन मजली घर, मोटरसायकल, 20 हजार रुपयांचा स्मार्टफोन आणि सहा आठवड्यात जमवले 2.5 लाख. ही गोष्ट आहे एका भिखारी महिलेची. तीच नाव आहे इंद्राबाई. ती एक गुन्हेगार असून मुलांना भिख मागायला लावते म्हणून पोलिसांनी तिच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. इंदूर पोलिसांनी अटक करुन तिची रवानगी तुरुंगात केली आहे. पोटच्या मुलांना भीख मागायला लावून इंद्राबाईने 45 दिवसात 2.5 लाख रुपयांची माया गोळा केली. तिच्या एका मुलीची सध्या NGO कडून काळजी घेतली जातेय. “उपाशी राहण्यापेक्षा आम्ही भिखेचा मार्ग निवडला. चोरी करण्यापेक्षा हे काम केव्हाही चांगला” असा इंद्राबाईने NGO च्या स्वयंसेवकांसोबत वाद घातला. इंद्राबाईला सात वर्षांची मुलगी आहे.
संबंधित NGO भिखाऱ्यांच्या पूनर्वसनासाठी इंदूर महापालिकेसोबत काम करते. या संस्थेने 7 हजार भिखाऱ्यांचा डेटा गोळा केलाय. त्यानुसार इंदूरच्या 38 महत्त्वाच्या चौकात भीख मागणाऱ्यांमध्ये 50 टक्के लहान मुल आहेत. ‘हे सर्व मिळून वर्षाला भिखेतून 20 कोटींची कमाई करतात’ असा अंदाज NGO ची स्वयंसेवक रुपाली जैनने व्यक्त केला. सात वर्षाच्या मुलीशिवाय इंद्रबाईला 10, 8,3 आणि 2 वर्षाची चार मुल आहेत. भीख कशी मिळवायची याची सुद्धा विचारपूर्वक रणनिती आखली होती. TOI ने हे वृत्त दिलय.
हा रस्ता झाल्याने कमाई दामदुप्पट
तिने सर्वात मोठ्या 10 वर्षाच्या मुलाला इंदूरच्या व्यस्ततम लव कुश चौकात भीख मागण्यासाठी ठेवलं होतं. या लवकुश चौकातून रस्ता पुढे उज्जैन महाकाल मंदिराकडे जातो. देवदर्शनासाठी जाणारे किंवा परतणार नागरिक काहीना काही दान करतात, म्हणून ती जागा निवडलेली असं इंद्राबाईने पोलिसांना सांगितलं. महाकाल लोकच्या बांधणीमुळे कमाई प्रचंड वाढल्याच तिने सांगितलं. महाकाल लोकच्या बांधणीआधी दिवसाला 2,500 लोक यायचे. आता दिवसाला हीच संख्या 1.75 लाख झाली आहे असं इंद्राबाईने सांगितलं.
पकडलं, तेव्हा किती रक्कम सापडली?
9 फेब्रुवारीला इंद्राला मुलांसोबत भीख मागताना पकडलं. तिचा नवरा आणि दोन मुल तिथून पळाली. पोलिसांना तिच्या एकूण 19,600 रुपये मिळाले. अटक होण्याआधी 45 दिवसात तिने भीख मागून 2.5 लाख रुपये कमावले. राजस्थान कोटा येथे तिच्याकडे दोन मजली घर, शेत जमीन आहे. नवऱ्याकडे मोटरसायकल चांगला स्मार्टफोन आहे.