नवी दिल्ली : नुकतच एक धक्कादायक हत्याकांड समोर आलय. अल स्टार्ट-अपच्या CEO ने आपल्या पोटच्या 4 वर्षाच्या मुलाची हत्या केली. सूचना सेठ असं आरोपी महिलेच नाव आहे. ती 39 वर्षांची आहे. या महिलेने मुलाला गोव्यात नेऊन हॉटेल रुममध्ये त्याची क्रूर हत्या केली. मुलाचा मृतदेह बॅगत भरुन ती कर्नाटकात पोहोचली होती. तिथे गोवा पोलिसांनी तिला अटक केल्यानंतर या भयानक हत्याकांडाचा खुलासा झाला. आता सूचना सेठच्या तपासातून रोज नवनवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. द माइंडफुल अल लॅबची सूचना सेठ CEO होती. सोमवारी रात्री कर्नाटकच्या चित्रदुर्गमध्ये तिला अटक करण्यात आली. गोवा पोलिसांच्या तपासातून काही कागदपत्र समोर आली आहेत. त्यानुसार, सूचना सेठला सहा दिवसांसाठी मुलाचा ताबा मिळाला होता.
प्राथमिक तपासात सूचना सेठची नवरा वेंकट रमनपासून घटस्फोट घेण्याची प्रक्रिया सुरु होती अशी माहिती समोर आलीय. तिने नवरा वेंकटवर घरगुती छळाचे आरोप केले होते. सूचना सेठने नवऱ्याकडे दर महिन्याला पोटगीची मागणी केली होती. नवऱ्याची वर्षाची कमाई 1 कोटी रुपये होती, असा सूचना सेठचा दावा होता. तपासात समोर आलेल्या कागदपत्रातून तिने नवऱ्याकडे पोटगीपोटी दरमहिन्याला 2.50 लाख रुपयाची मागणी केली होती. तिच्या नवऱ्याची महिन्याची कमाई 9 लाख रुपये होती.
दोघांच लग्न कधी झालेलं?
नवऱ्याने मारहाण केल्याने मार्च 2021 पासून ती स्वतंत्र राहत होती. घरगुती हिंसाचाराच्या आरोपाला पुरावा म्हणून तिने व्हॉट्स app मेसेज, फोटो आणि मेडीकल रेकॉर्ड कोर्टात सादर केले होते. 18 नोव्हेंबर 2010 रोजी त्यांच कोलकात्यात लग्न झालं. 14 ऑगस्ट 2019 रोजी मुलाचा जन्म झाला. ऑगस्ट 2022 मध्ये तिने पती वेंकट रमन पीआर विरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार नोंदवली. मला आणि माझ्या मुलाला नवरा मारहाण करतो, असा आरोप सूचना सेठने केला होता. सूचना सेठने गुन्हा केला, त्यावेळी तिचा नवरा परदेशात होता. नवऱ्याने कोर्टात त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले होते. घटस्फोटाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना कोर्टाने वेंकट रमन पीआरवर मुलाला भेटण्यावर निर्बंध घातले होते.