रामेश्वरम कॅफे ब्लास्ट प्रकरणात NIA ला महत्त्वपूर्ण यश मिळालय. राष्ट्रीय तपास यंत्रणेने पश्चिम बंगाल कोलकाता येथून शुक्रवारी दोघांना ताब्यात घेतलं. यात एक मास्टरमाईंड आहे. मुसावीर हुसैन शाहजीब असं एका आरोपीच नाव आहे. कॅफेमध्ये त्याने IED स्फोटक ठेवली होती. अब्दुल मतीन ताहा दुसऱ्या आरोपीच नाव आहे. तो रामेश्वर कॅफे ब्लास्ट प्रकरणाचा मुख्य मास्टरमाईंड आहे. त्याने सर्व आखणी करुन अमलबजावणी केली. NIA कडून स्टेटमेंटमध्ये ही माहिती देण्यात आलीय.
एनआयएने शुक्रवारी पहाटे फरार आरोपींना कोलकाता येथून ताब्यात घेतलं. खोटी ओळख दाखवून ते तिथे राहत होते. “केंद्रीय गुप्तचर यंत्रणा, पश्चिम बंगाल, तेलंगण, कर्नाटक आणि केरळ या राज्य पोलीस यंत्रणांच्या उत्तम समन्वयामुळे आरोपींना शोधून पकडणं शक्य झालं” असं एनआयएने स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे. मुसावीर हुसैन शाहजीब याने कॅफेमध्ये IED ठेवले होते. अब्दुल मतीन ताहाची त्याच्यामागे प्लानिंग होती.
किती लाखांच होतं बक्षीस?
बंगळुरु रामेश्वरम कॅफे ब्लास्ट प्रकरणातील आरोपींची माहिती देणाऱ्यांसाठी NIA ने 10 लाख रुपयांच बक्षीस ठेवलं होतं. माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवणार असल्याचही एनआयएकडून सांगण्यात आलं होतं. रामेश्वरम कॅफेमध्ये बॉम्ब ठेवणाऱ्याचा सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालेला फोटो एजन्सीने प्रसिद्ध केला होता. आरोपीने कॅप, काळी पँट आणि काळ्या रंगाचे शूज घातल्याच फोटोमध्ये दिसत होतं.
कधी झालेला स्फोट?
रामेश्वरम कॅफेमध्ये 1मार्चला बॉम्बस्फोट झाला होता. 3 मार्चला या प्रकरणाचा तपास NIA कडे सोपवण्यात आला. बंगळुरुच्या व्हाइटफिल्ड एरियामध्ये हा कॅफे आहे. या स्फोटात अनेकजण जखमी झाले होते. दुपारी लंचच्यावेळी हा स्फोट झाला होता.