पुणे : क्यूआर कोडच्या (QR code) माध्यमातून आर्थिक व्यवहारांची सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या भारत पे (Bharat Pay)या कंपनीचे संकेतस्थळ पुण्यातील चार एथिकल हॅकर (Ethical hacker) तरुणांनी हॅक केले. यावेळी त्यांनी संकेतस्थळावरील सुरक्षिततेसंदर्भात राहिलेल्या त्रुटीही कंपनीला दाखवून दिल्या. या त्रुटींची कंपनीकडूनही गांभीर्याने दखल घेत संकेतस्थळामध्ये तातडीने दुरुस्ती केली आहे. पुण्यातील श्रेयस गुजर, ओंकार दत्ता, शारूक खान आणि अम्रित साहू हे तरूण एथिकल हॅकर आहेत. या चौघांपैकी श्रेयस आणि ओंकार हे सर्टिफाईड एथिकल हॅकर आहेत.
संगणकावर किंवा संगणकीय जाळय़ावर साठवून ठेवलेली महत्त्वपूर्ण माहिती नैतिकतेने किंवा परवानगीने पाहणे किंवा बदलणे याला एथिकल हॅकिंग म्हणतात.
संगणकीय प्रणाली, संगणकातील धोके किंवा असलेल्या त्रुटींचे सोडवणे, त्यांची सुरक्षितता वाढवणे हा एथिकल हँकिंगचा हेतू असतो. श्रेयस गुजरने या पूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचेही संकेतस्थळ हॅक करून त्यातील त्रुटी विद्यापीठाला दाखवून दिल्या होत्या. त्यानंतर आता मोठय़ा प्रमाणात आर्थिक व्यवहार करणाऱ्या भारत पेसारख्या नामांकित कंपनीचे संकेतस्थळ हॅक करून प्रणालीतील त्रुटींची माहिती ट्विटद्वारे कंपनीला सांगण्यात आली. त्यानंतर कंपनीने या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन या तरुणांना संपर्क साधत लगेचच प्रणालीमध्ये आवश्यक ती दुरुस्ती केली.
भारत पेच्या संकेतस्थळावर देशभभरातील सत्तर लाखांहून अधिक दुकानदार आहेत. त्या खात्यामध्ये त्यांच्या आर्थिक व्यवहारांची माहिती साठवली जाते. दुकानदार त्या खात्यावरूनच त्यांच्या व्यवहारांची माहिती घेतात. त्यामुळे या सेवेचा त्यांनी अभ्यस केला. त्यावेळी त्यातील ‘ऑथेंटिकेशन सिस्टिम’मध्ये त्रुटी असल्याचे आढळून आले. या त्रुटीमुळे गैरप्रकार होऊ शकला असता, त्यामुळे कंपनीने तात्काळ दुरुस्ती केली आहे.
संकेतस्थळ आणि प्रणालीतील त्रुटी दाखवल्याबाबत कंपनीकडून मुख्य व्यापार अधिकारी विजय अगरवाल यांनी आभार मानणारा ई-मेल या तरुणांना पाठवला आहे. तसेच त्यांना पारितोषिक देऊनही त्यांचा गौरव केला गेला आहे. सायबर सुरक्षा, विदा सुरक्षा या संदर्भात आपल्याकडे कडक कायद्यांची उणीव आहे. ऑनलाइन माध्यमे, डिजिटल व्यवहार वाढत असताना आता वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेसाठी कायद्यांची आणि जनजागृतीची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.