नाशिकः पालकमंत्री छगन भुजबळ आणि पंकज भुजबळ यांच्या नावे पुन्हा एकदा धमकीचे फोन आल्याचा प्रकार घडला आहे. जळगाव जिल्ह्यातल्या बहुचर्चित भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेप्रकरणी अटकेत असलेले सुनील झंवर यांचा मुलगा सूरज झवंर यांना हे फोन आले आहेत. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक जिल्ह्यात अनेकदा भुजबळांच्या बंगल्यावरून बोलत असल्याच्या धमकीचे फोन करण्याचे प्रकार घडले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी निफाडच्या महेंद्र पाटीलला पूर्वीच बेड्या ठोकल्या आहेत. आता असाच एक फोन सूरज झंवर यांना आल्याचे समजते. झवंर यांचे वडील सुनील झंवर हे भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेप्रकरणी अटकेत आहेत. याचप्रकरणी सूरज यांचीही चौकशी सुरू आहे. त्यांना 9423421111 या क्रमांकावरून फोन आला. समोरच्या व्यक्तीने पंकज भुजबळ बोलत असल्याचे सांगितले. सोबतच 8 सप्टेंबर रोजी भेटण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावले. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरून एक फोन आला. त्यावरून भुजबळांचा पीए बोलत असल्याचे सांगितले. सोबतच तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात का आला नाहीत, अशी विचारणा केली. त्यानंतर जळगाव येथून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या नावे एक फोन आला. त्या व्यक्तीने सूरज यांना तुमचे कोणते काम करायचे आहे, अशी विचारणा केली.
फोन करणाऱ्या व्यक्तीने पालकमंत्री छगन भुजबळ आणि पंकज भुजबळ यांच्या नावाचाही वापर केला. सूरज यांनी मित्राच्या घरून संबंधितांना फोन केला. तेव्हा समोरून छगन भुजबळ बोलत असल्याचे सांगितले. तुम्ही आमचे काम करा. तुम्हाला समीर व पंकज मदत करतील. तुमचेही एक मोठे काम करून देण्यात येईल, असा निरोप दिला. भुजबळांच्या नावे धमकीचे फोन करून पूर्वीप्रमाणेच खोडसाळपणा सुरू असल्याचा संशय आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
आमदार कांदेंनाही आले होते फोन
शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी आपल्याला छगन भुजबळांविरोधात दाखल केलेली याचिका मागे घ्यावी म्हणून भुजबळांच्या नावे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या टोळीचा फोन आल्याचा आरोप केला होता. मात्र, हे आरोप छोटा राजनचा पुतण्या आणि रिपाइं आठवले गटाचे युवा प्रदेशाध्यक्ष अक्षय निकाळजे यांनी फेटाळून लावले होते. त्यानंतर नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी या प्रकरणाचे चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पोलीस आता आमदार कांदे यांच्यासह अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा पुतण्या आणि रिपाइं आठवले गटाचे युवा प्रदेशाध्यक्ष अक्षय निकाळजे यांना समन्स बजावणार असून, दोघांचेही जबाब नोंदवले जाणार आहेत.
इतर बातम्याः
मालेगाव ड्रग तस्करीचा अड्डा; माफियाची शहरात कोट्यवधींचा मालमत्ता, कुत्ता गोळीचा पुरवठा
(Bhujbal’s name again threatening phone, Jalgaon District Collector’s name was also taken, police started investigation)