बीड : श्रीमंत घरांमधील काही मुलं कशाप्रकारे माज करतात ते चित्रपटांमध्ये आपण बघितलं आहे. या चित्रपटांमध्ये आणि वास्तव्यात फारसं काही वेगळं नाही हेच आता स्पष्ट होतंय. कारण बीडच्या परळी तालुक्यात एका श्रीमंत घरातील बड्या नेत्याच्या मुलाने दारु पिऊन अलिशान गाडी चालवली. त्याने फक्त तेवढंच केलं नाही तर त्याने भरधाव वेगाने गाडी चालवत एका दुचाकीस्वाराला जोराची धडक दिली. या घटनेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आता या बड्या नेत्याच्या मुलावर पोलीस कारवाई करतील का? असा प्रश्न मृतक तरुणाच्या नातेवाईकांकडून उपस्थित केला जातोय.
संबंधित दुर्घटनेत प्रमोद तांदळे या तरुणाचा मृत्यू झाला आहे. प्रमोदच्या दुचाकीला धडक देणारा तरुण हा परळी नगर परिषदेचा माजी नगराध्यक्षाचा मुलगा आहे. प्रमोद परळी शहरापासून काही अंतरावर असणाऱ्या तळेगाव परिसरात दुचाकीने चालला होता. यावेळी भरधाव वेगात आलेल्या एका अलिशान कारने त्याला जोराची धडक दिली. या धडकेत प्रमोद दूरवर फेकला गेला आणि जमिनीवर जोरात कोसळला. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर मृतक प्रमोदच्या नातेवाईकांना या अपघाताची माहिती मिळाली. प्रमोदच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेऊन टाहो फोडला. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाणे गाठलं. त्यांनी परळी ग्रामीण पोलीस ठाण्याबाहेर आक्रोश केला. तिथे त्यांनी ठिय्या आंदोलनही केलं. संबंधित कारचालकावर कारवाई करुन आम्हाला न्याय मिळवून द्या, अशी मागणी मृतकाच्या नातेवाईकांनी केली. यावेळी पोलिसांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण आंदोलक ऐकूण घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. या सर्व घडामोडींनंतर पोलीस या प्रकरणी संबंधित बड्या नेत्याच्या मुलावर काय कारवाई करतात? याकडे संपूर्ण शहारातील नागरिकांचं लक्ष लागलं आहे.
या घटनेनंतर शहरात बरीच चर्चा सुरु आहे. संबंधित बड्या नेत्याने त्याच्या मुलाला वाढदिवसाची गिफ्ट म्हणून अलिशान कार दिली होती. मुलाचा अनेक दिवसांपासून त्या कारसाठी हट्ट होता. त्यामुळे त्याच्या वडिलांनी वाढदिवसाचं निमित्त साधत अलिशान कार गिफ्ट म्हणून दिली होती. पण मुलाने लाखो रुपयांची तीच कार दारुच्या नशेत चालवून एका निष्पाप तरुणाचा जीव घेतला. त्यामुळे परिसरात संताप व्यक्त केला जातोय.
हेही वाचा :
पोलीस निरीक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या, पुणे पोलिसात खळबळ, अधिकाऱ्याने इतका टोकाचा निर्णय का घेतला?
तिने प्रियकराला घाबरुन घरात सीसीटीव्ही लावले, अवघ्या एक तासात कॅमेऱ्यात भयानक थरार कैद