पाटणा – प्रेम प्रकरणानंतर फोटो व्हायरल झाल्याने बेदम मारहाण करुन डॉक्टरची हत्या केल्याची धक्कादायक घटना बिहारमध्ये उघडकीस आली आहे. गावकरी आणि महिलेच्या कुटुंबीयांकडून अमानुषपणे करण्यात आलेल्या मारहाणीत डॉक्टरचा जागीच मृत्यू झाला. बिहारच्या जमुई जिल्ह्यातील गिधौर पोलीस स्टेशन परिसरातील सेवा गावात हा प्रकार घडल्याची माहिती आहे. मनोज पंडित असे मृत 40 वर्षीय डॉक्टरचे नाव आहे. सोमवारी रात्री ग्रामस्थांनी डॉ. मनोज पंडित यांना पकडून अमानवी मारहाण केल्याचा आरोप आहे. हत्येनंतर मृताच्या नातेवाईकांनी दोषींना अटक करण्याची मागणी पोलिस प्रशासनाकडे केली आहे.
काय आहे प्रकरण?
बिहारच्या ग्रामीण भागात सेवा बजावणारे 40 वर्षीय डॉक्टर मनोज पंडित यांचे गावातील एका महिलेशी प्रेमसंबंध असल्याचे सांगितले जाते. उपचारासाठी महिलेच्या घरी जाणारे डॉक्टर पंडित तिच्या प्रेमात पडले होते. त्या दोघांचा एक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्याच फोटोवरुन गावात बोभाटा झाला आणि काही गावकऱ्यांसह त्या महिलेच्या कुटुंबातील सदस्यांनी डॉ. मनोज पंडित यांना पकडून बेदम मारहाण केली. ही मारहाण इतकी जबरदस्त होती, की डॉक्टरांनी जागीच प्राण सोडले.
मयत डॉक्टरच्या भावाचा दावा काय?
महिलेशी प्रेमसंबंध आणि फोटो व्हायरल झाल्यामुळे केलेल्या मारहाणीत डॉक्टरचा मृत्यू झाल्या प्रकरणी गौतम रविदास, किशन रविदास यांच्या कुटुंबासह दोन डझन जणांवर हत्येचा आरोप करण्यात आला आहे. मयत डॉक्टरचा भाऊ कृष्णा रंजन कुमार याने सांगितले, की “जर माझा दादा उपचारासाठी घरी गेल्यावर एका महिलेच्या प्रेमात पडला होता किंवा दोघांचा एकत्र फोटो व्हायरल झाला होता, तर फक्त माझा भाऊच त्यात दोषी कसा? त्या महिलेचाही तितकाच दोष आहे. मात्र लोकांनी बेदम मारहाण करुन माझ्याच भावाचा जीव घेतला. आक्षेप होता, तर या प्रेम प्रकरणाची किंवा व्हायरल फोटोची पोलिस प्रशासनाकडे त्यांनी तक्रार करायला हवी होती.” असं मयत डॉक्टरच्या भावाचं म्हणणं आहे.
या प्रकरणात, एसडीपीओ डॉ राकेश कुमार यांनी सांगितले की, गिधौरमध्ये सेवा करणाऱ्या ग्रामीण डॉक्टरांना मारहाण केल्याचे प्रकरण समोर आले आहे. कुटुंबाच्या तक्रारीनुसार गुन्हा नोंदवताना, पोलीस स्टेशन प्रमुखांना कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या प्रकरणात जो दोषी असेल त्याला सोडले जाणार नाही, सर्व बाजूंची चौकशी केली जात आहे, असे आश्वासन पोलिसांनी दिले.
संबंधित बातम्या :
सायन हॉस्पिटलमध्ये डॉक्टर-नर्सला मारहाण, रुग्णाच्या नातेवाईकांवर कारवाईसाठी डॉक्टरांचा कँडल मार्च
मूल नसल्यावरुन डॉक्टर वहिनीचे सततचे टोमणे, दीराकडून हातोडी-कात्रीने वार करत हत्या
जालन्यात नराधम टोळक्याची प्रेमी युगुलाला मारहाण, 5 जणांना अटक