दोघा पोलिसांची थेट न्यायाधीशांना मारहाण, पिस्तुलही ताणले, भर कोर्टात हलकल्लोळ

| Updated on: Nov 19, 2021 | 11:09 AM

गोपाल प्रसाद आणि अभिमन्यू कुमार यांनी अचानक न्यायाधीशांवर हल्ला केला आणि त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर एका आरोपीने न्यायाधीशांवर पिस्तूल रोखले. या हल्ल्यात एडीजे अविनाश कुमार सुरक्षित

दोघा पोलिसांची थेट न्यायाधीशांना मारहाण, पिस्तुलही ताणले, भर कोर्टात हलकल्लोळ
प्रातिनिधीक फोटो
Follow us on

पाटणा : बिहारच्या मधुबनी जिल्ह्यात दोन पोलिसांनी न्यायाधीश अविनाश कुमार यांना बेदम मारहाण करत त्यांच्यावर पिस्तुल ताणून धरली. पोलिसांच्या या वर्तनामुळे न्यायालयात एकच गोंधळ उडाला. मधुबनीमधील झांझारपूरमध्ये हे प्रकरण घडले असून अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश (ADJ) अविनाश कुमार यांच्यावर हल्ला केल्याचा आणि त्यांना अश्लील शब्दात शिवीगाळ केल्याचा दोन पोलिसांवर आरोप आहे. न्यायाधीशांवर हल्ला केल्याप्रकरणी दोन्ही आरोपींची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, एसएचओ गोपाल प्रसाद आणि पोलीस उपनिरीक्षक अभिमन्यू कुमार यांनी वादानंतर एडीजे अविनाश कुमार यांच्यावर हा हल्ला केला. गोपाल प्रसाद आणि अभिमन्यू कुमार यांनी अचानक न्यायाधीशांवर हल्ला केला आणि त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर एका आरोपीने न्यायाधीशांवर पिस्तूल रोखले. या हल्ल्यात एडीजे अविनाश कुमार सुरक्षित असले तरी ते स्वत:वर झालेल्या हल्ल्यामुळे खूप भयभीत झाले आहेत.

बचावाला आलेले वकीलही जखमी

आता पाटणा हायकोर्टानेही या प्रकरणाची दखल घेतली असून 29 नोव्हेंबरला या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. या घटनेबाबत पाटणा उच्च न्यायालयाने आता बिहार सरकारचे प्रधान सचिव, पोलिस महासंचालक पाटणा, गृह विभाग आणि मधुबनीचे पोलिस अधीक्षक (एसपी) यांच्याकडून उत्तरे मागवली आहेत. न्यायमूर्तींवर झालेल्या हल्ल्यादरम्यान बचावासाठी आलेले काही वकीलही जखमी झाले होते. त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

कोण आहेत आरोपी

दोन्ही आरोपी बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातील घोघरडिहा पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. गोपाल प्रसाद घोघरडिहा पोलीस ठाण्यात स्टेशन प्रमुख आहे, तर दुसरा आरोपी त्याच पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक पदावर आहे.

निकालांमुळे जज चर्चेत

अहवालानुसार, एडीजे यापूर्वीही त्यांच्या निकालांसाठी चर्चेत राहिले आहेत. एखाद्या खटल्यातील आरोपींवर योग्य ती कलमे लागू न केल्याबद्दल त्यांनी एसपी आणि डीएसपींवरही भाष्य केले होते आणि त्यांना कायद्याची माहिती नसल्याचे सांगितले होते.

न्यायाधीश अविनाश कुमार यांनी त्यांच्या निकालादरम्यान जिल्ह्याच्या एसपी (पोलीस कॅप्टन) यांच्यावरही अनेकदा भाष्य केले आहे. या खटल्याच्या सुनावणीसाठी दोन्ही आरोपी पोलिसांना न्यायालयात हजर केले असता दोघांनी हल्ला केला.

बार असोसिएशनकडून निषेध

या घटनेबाबत बार असोसिएशन झांझारपूरचे उपाध्यक्ष म्हणाले की, कोर्टात वादविवाद सुरू असताना न्यायाधीश साहेबांवर दोन पोलिसांकडून ज्या पद्धतीने हल्ला झाला आहे तो अत्यंत निषेधार्ह असून हा न्याय व्यवस्थेला दडपण्याचा प्रयत्न आहे. या संपूर्ण प्रकरणावरून त्यांनी जिल्ह्यातील पोलीस कप्तानांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करून लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी बार असोसिएशनच्या वकिलांनी केली असून ती न झाल्यास मोठे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

नागपुरात महिला पोलिसाची आत्महत्या, राहत्या घरी गळफास, पाच वर्षांची मुलगी वाऱ्यावर

विवाहबाह्य संबंधातून अल्पवयीन मुलाकडून विवाहितेची हत्या, मृतदेहाचे प्रायव्हेट पार्टही पेटवले

महिला लिपिकाची राहत्या घरी आत्महत्या, पती म्हणतो, ‘त्याच्या’ त्रासामुळे बायकोने आयुष्य संपवलं