Mahendra More death | गोळीबारात जखमी झालेले भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांचा मृत्यू

| Updated on: Feb 10, 2024 | 9:14 AM

Mahendra More death | चाळीसगाव शहरातील हनुमान वाडी या ठिकाणी हा गोळीबार झाला होता. या प्रकरणात चाळीसगाव शहर पोलिसांनी सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला.

Mahendra More death | गोळीबारात जखमी झालेले भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांचा मृत्यू
mahendra more death
Follow us on

जळगाव (खेमचंद कुमावत) : जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव येथे गोळीबार प्रकरणात गंभीर जखमी झालेले भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांचा मृत्यू झाला आहे. उपचारादरम्यान महेंद्र मोरे यांनी मध्यरात्री अखेरचा श्वास घेतला. सुरुवातीला महेंद्र मोरे यांना चाळीसगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण ते उपचारांना साथ देत नव्हते. म्हणून त्यांना नाशिकच्या अशोक हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं होतं. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु असताना प्राणज्योत मालवली.

7 फेब्रुवारीला महेंद्र मोरे हे आपल्या कार्यालयामध्ये बसलेले असताना त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारात महेंद्र मोरे हे गंभीरित्या जखमी झाले होते. चाळीसगाव शहरातील हनुमान वाडी या ठिकाणी हा गोळीबार झाला होता. या प्रकरणात चाळीसगाव शहर पोलिसांनी सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून मात्र अजून एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.

पोलिसांच्या हाती आतापर्यंत काय लागलय?

गोळीबाराच्या या घटनेमुळे चाळीसगावात कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झालीय. सात पैकी पोलीस अजून एकाही आरोपीला अटक करु शकलेले नाहीत. फक्त या गोळीबारासाठी वापरलेली गाडी पोलिसांनी जप्त केली. फक्त पूर्ववैमनस्यातून हा गोळीबार झाल्याच सांगण्यात येतय. चाळीसागाव पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी विविध पथक तयार केली आहेत. पण अजून आरोपीला अटक झालेली नाही.

राज्यामध्ये काय चाललय?

काही दिवसांपूर्वी जिल्ह्याच्या नव्या एसपींनी चाळीसगावला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला होता. महेंद्र मोरे यांच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया अजून समजू शकलेली नाही. दोन दिवसांपूर्वीच ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. फेसबुक लाइव्ह दरम्यान मॉरिस नावाच्या आरोपीने त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला होता. त्याआधी मागच्या आठवड्यात कल्याणचे भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशनमध्ये फायरिंग केली होती. या घटनांमुळे राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.