भोपाळ : मध्य प्रदेश लोकायुक्ताच्या टीमने मंगळवारी राजगढ जिल्हा हॉस्पिटलमधील स्टोर कीपर अशफाक अलीच्या घरावर छापेमारी केली. विदिशाच्या लटेरी भाग आणि भोपाळमधील काही ठिकाणी ही छापेमारीची कारवाई करण्यात आली. लोकायुक्ताच्या टीमला अशफाक अलीकडे सर्वाधिक 10 कोटीपेक्षा अधिकची काळी कमाई सापडली आहे. मोठ्या प्रमाणात सोन्या-चांदीचे दागिने आणि प्रॉपर्टीची कागदपत्र सापडली आहेत. नोट मोजण्याच्या मशीनने काळ्या कमाईची मोजणी सुरु आहे.
विदिशाच्या लटेरी भागात राहणारा अशफाक अली राजगढ जिल्हा हॉस्पिटलमध्ये स्टोर कीपर म्हणून नोकरी करायचा. त्याच्याविरोधात उत्त्पनापेक्षा अधिकची संपत्ती असल्याची तक्रार मिळाली होती.
छापेमारीत काय सापडलं?
आतापर्यंतच्या तपासात अशफाक अली, त्याचा मुलगा जीशान अली, शारिक अली, मुलगी हिना कौसर आणि पत्नी राशिदा बी यांच्या नावावर 16 अचल संपत्ती खरेदी करण्याचा रेकॉर्ड आहे. त्याशिवाय 50 पेक्षा अधिक अचल संपत्तीबद्दल लटेरी विदिशा आणि भोपाळमधून माहिती गोळा केली जात आहे.
लोकायुक्ताच्या टीमने काय कारवाई केली?
मंगळवारी लोकायुक्ताच्या टीमने अशफाक अलीची ग्रीन व्हॅली कॉलनी, भोपाळ आणि लटेरी येथील घरावर छापेमारीची कारवाई केली. अशफाक अलीने लटेरी येथे ‘मुस्ताक मंजिल’ नावाने तीन मजली इमारत बांधली आहे. यात एक प्रायव्हेट शाळा आहे. भोपाळ येथील घरात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सापडली. त्याची मोजणी सुरु आहे.
किती कोटीपर्यंत संपत्ती असू शकते?
सोन्या-चांदीचे दागिने, किंमती घड्याळ आणि घरगुती वापराच सामान मिळालय. त्याची यादी बनवली जात आहे. आतापर्यंतचा तपास आणि शोध मोहिमे दरम्यान आरोपी अशफाक अली आणि त्याच्या कुटुंबियांच्या नावावर 10 कोटी रुपयापर्यंत चल-अचल संपत्ती असू शकते.