कॅलिफोर्निया : विकृत माणसं जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असू शकतात. ते भारतातही असू शकतात. तसेच अमेरिकेसारख्या विकसित देशातही असू शकतात. अमेरिकेतल्या एका विकृताने केलेल्या एका कृत्याची जगभरातील प्रसारमाध्यमांनी दखल घेतली आहे. अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात संबंधित घटना घडली आहे. एका 50 वर्षीय महिलेची तिच्याच प्रियकराने हत्या केली आहे. विशेष म्हणजे महिलेला आपल्या प्रियकरावर संशय होता. त्यामुळे तिने घरात सीसीटीव्ही कॅमेरे लावले. तिने घरात सीसीटीव्ही कॅमेरे लावल्यानंतर अवघ्या एक तासात तिच्या प्रियकराने तिची हत्या केली. या हत्येचा थरार सीसीटीव्हीत अचूकपणे कैद झाला आहे.
संबंधित महिलेचं मॅरीयू असं नाव आहे. तिचे बीचर नावाच्या एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. पण हा तरुण हल्ली तिला खूप त्रास देत होता. हा तरुण गांज्याची शेती करायचा. पण गेल्या काही दिवसांपासून तो आर्थिक अडचणींतून जात होता. त्यातूनच त्याच्यातील सैतान जागी झाला होता. तो त्याची प्रेयसी असलेल्या मॅरीयू या महिलेकडून वारंवार पैशांची मागणी करायचा. महिलेने सुरुवातीला त्याला प्रियकर अडचणीत असल्याचं मानून पैसे दिले. पण तो वारंवार तिच्याकडून पैसे मागू लागला. त्यामुळे महिलाही त्याला वैतागली. महिलेने त्याला पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर आरोपीने त्याच्यातील रौद्र रुप धारण केलं. तो महिलेला वारंवार मारहाण करुन तिच्याकडून पैसे हिसकावू लागला.
प्रियकराच्या या जाचाला कंटाळून महिलेने याआधी 2016 मध्येही तक्रार केली होती. त्यानंतही तो महिलेला त्रास देत होता. अखेर 28 ऑगस्टला महिलेने 911 या नंबरवर फोन करुन पोलिसांकडे आरोपीची तक्रार केली. बीचरच्या कृत्यांपासून सुटका व्हावी, त्याला शिक्षा मिळावी यासाठी त्याच्या कृत्यांचा पुरावा असणं जास्त जरुरीचं होतं. त्यामुळे महिलेने घरात सीसीटीव्ही कॅमेरे लावले. पण घरात सीसीटीव्ही कॅमेरे लावल्यानंतर अवघ्या तासाभरात आरोपी बीचरने तिची हत्या केली. आरोपीला घरात सीसीटीव्ही कॅमेरे असल्याची माहिती नव्हती. नाहीतर त्याने पुरावा नष्ट करण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न केला असता.
आरोपी मध्यरात्री साडेबारा वाजता महिलेची हत्या केली. त्याआधी तो घरात शिरण्यासाठी संधी शोधत होता. महिला हत्येच्या संध्याकाळी घरातच होती. घराबाहेर पडली नव्हती. आरोपी बीचर हा घराबाहेर लपून दबा धरुन बसला होता. त्याने जणूकाही महिलेची हत्या करण्याचा कट आधीच रचला होता. अखेर महिला रात्री तिच्या कुत्र्याला घराबाहेर काढलं. याचवेळी आरोपी बीचरने योग्य संधी साधत महिलेला घेरलं. तो मध्यरात्री सव्वाबारा वाजेच्या सुमारास घरात शिरला. त्याने घरात शिरताच महिलेच्या नाकावर बुक्का मारला. महिला त्यात गंभीर जखमी झाली. त्यानंतर त्याने महिलेचा गळा दाबून तिची हत्या केली. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात अचूकपणे कैद झाला.
याप्रकरणाची पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तिथे घराची झळती घेतली असता घरात कॅमेरा असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता ते देखील चक्रावले. याप्रकरणाचा सविस्तर तपास केला असता पोलिसांना सर्व प्रकार लक्षात आला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी बीचरला बेड्या ठोकल्या आहेत. कोर्टाने त्याला दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे.
हेही वाचा :
पोलीस निरीक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या, पुणे पोलिसात खळबळ, अधिकाऱ्याने इतका टोकाचा निर्णय का घेतला?