भंडारा : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने म्हणजेच एसीबीने भंडाऱ्यात एक अनोखी कारवाई केली आहे. एसीबीने भंडारा पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याला 3 हजार रुपयांची लाच देणाऱ्या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. निवास ठाकरे (वय 42 वर्षे), नंदकिशोर ठाकरे (वय 28) अशी आरोपींची नावं आहेत. दोन्ही आरोपी पेशाने शेतकरी आहेत. तसेच ते ट्रॅक्टरदेखील चालवतात. ते वाळू तस्कर असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यांनी पोलीस कर्मचाऱ्याला लाच देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे एसीबीने दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या.
संबंधित प्रकार हा भंडाऱ्याच्या लाखांदूप पोलीस ठाणे येथे घडला आहे. या प्रकरणी संबंधित पोलीस शिपायाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली होती. पोलिसांनी वाळू तस्कर आरोपींवर कारवाई करत त्यांचे ट्रॅक्टर जप्त केलं आहे. हेच ट्रॅक्टर परत सोडविण्यासाठी आरोपी संबंधित पोलीस शिपायावर जबरदस्ती 3000 रुपयांची लाच देवून ट्रॅक्टर परत देण्याचा दबाव निर्माण करत होते. पण पोलिसाने वेळीच एसीबीकडे तक्रार केली.
पोलीस शिपायाच्या तक्रारीनंतर आरोपींना रंगेहात पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला. संबंधित पोलीस कर्मचारी आरोपींसोबत फोनवर सगळ्या गोष्टींना सहमती देऊ लागला. फोनवर झालेल्या संभाषणानुसार अखेर आरोपी पोलीस ठाण्यात लाच देण्यासाठी आले. त्यांनी पोलिसाला लाच दिली. त्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी तातडीने त्यांना रंगेहात पकडत बेड्या ठोकल्या. विशेष म्हणजे लाच घेणाऱ्याला नेहमी अटक होत असताना लाच देणाऱ्याला अटक होण्याची ही बहुदा पहिलीच घटना असावी, अशी चर्चा सध्या भंडाऱ्यात या कारवाईनंतर सुरु आहे.
दुसरीकडे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुण्यात मध्यरात्री मोठी कारवाई केली. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य आणि उपायुक्त नितीन ढगे यांना 1 लाख 90 हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले आहे. अचानकपणे करण्यात आलेल्या या कारवाईमुळे चांगलीच खळबळ उडाली होती. नितीन चंद्रकांत ढगे (वय 40) असे पकडण्यात आलेल्या उपायुक्ताचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन ढगे हे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात उपायुक्त आहेत. तसेच ते जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्यदेखील आहेत. दरम्यान तक्रारदाराने त्याच्या पत्नीचे जात प्रमाणपत्र पडताळणी करून ते वैध करण्यासाठी जिल्हा जात पडताळणी कार्यालयात अर्ज केला होता. त्यावेळी नितीन ढगे यांनी तक्रारदाराकडे 8 लाख रुपयांची लाच मागितली.
याबाबत तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दाखल केली होती. दाखल तक्रारीनुसार एसीबीने सापळा रचला. नंतर नितीन ढगे यांना 1 लाख 90 हजार रुपये घेताना रंगेहाथ अटक करण्यात आलं. सध्या उपायुक्त एसीबीच्या ताब्यात असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत आहे.
हेही वाचा :
दसऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी कर्णपुऱ्यातील बालाजी मंदिरात जबरी चोरी, तीन दानपेट्या लंपास