खाताना ठसका लागला, तर त्याला हलक्यात कधीच घेऊ नये. ठसका लागणं जीवावर बेतू शकतं. अनेकदा ठसका फार मोठा नसतो. पण त्याचे परिणाम गंभीर ठरु शकतात. ठसका लागल्यानं किती भयंकर बाब घडू शकते हे अधोरेखित करणारी एक घटना छिंडवाडामध्ये (Chindhwada) घडली. एका तरुणीचं लग्न होतं. दुसऱ्या दिवशी लग्न आणि आदल्या दिवशी हळद ही ठरलेली. हळदीच्या दिवशी ढोकळा खाताना या तरुणीला जोराचा ठसका लागला. ठसका लागल्यानं या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू (Shocking death) झाला. या घटनेनं सगळेच हादरुन गेले. लग्नाच्या एक दिवस अगोदर ज्या तरुणीसोबत ही घटना घडली, ती तरुणी डॉक्टर (Doctor bride) असल्याचीही माहिती समोर आली आहे.
ढोकळा खाऊन ठसका लागल्यानं मृत्यू झालेल्या तरुणीचं नाव मेघा काळे असं आहे. मेघा स्वतः डॉक्टर होती. लग्नाच्या एक दिवस अगोदर ती हळदीच्या दिवशी नाश्ता करत होती. नाश्ता करताना मेघाला जोरात ठसका लागला. त्यानंतर ती लगेच पाणी प्यायली. पाणी प्यायल्यानंतर मेघाला बोलताही येत नव्हतं.
प्रकृती खालावत असल्याचं पाहून मेघाला तिच्या कुटुंबीयांनी तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं. पण उपचारादरम्यान, तिची प्रकृती अधिकच खालावली आणि आयुष्याशी सुरु असलेली तिची झुंज अपयशी ठरली. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
20 मे रोजी छिंडवाडामध्ये मेघाचं लग्न होतं. लग्नासाठी शहनाई लॉन बुक करण्यात आला होता. लग्नाची सगळी तयारी पूर्ण झाली होती. पत्रिका वाटून झाल्या होत्या. हळदीचा उत्साह सुरु होता. मात्र या सगळ्या उत्साहाला आणि आनंदाला गालबोट लागलंय.
दरम्यान, पोलिसांनी मेघाच्या मृत्यूचं नेमकं कारणं स्पष्ट करण्यासाठी पोस्टमॉर्टेम केलाय. नाश्त्यामधील नमुनेही तपासणीसाठी ताब्यात घेतले आहे. ढोकळा घाऊन ठसका लागल्यानं झालेल्या मेघाच्या मृत्यूनं तिच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय.