नाशिकः उद्योगनगरी, पर्यटननगरी म्हणून देशभर नाव कमावणाऱ्या नाशिकमध्ये सध्या खुनी खेळ सुरू झालेला दिसतोय. दोनच दिवसांपूर्वी झालेल्या पोलीस पुत्राच्या निर्घृण खुनानंतर आता आणखी एका तरुणाची अतिशय निर्घृण हत्या झाल्याचे समोर आले आहे. म्हसरूळ आरटीओ ऑफिसजवळ ही घटना घडली. राजू शिंदे असे मृताचे नाव आहे.
एरवी रम्य, शांत असणारे नाशिक या आठवड्यात घडलेल्या एकेका घटनांनी हादरून गेले आहे. अगदी कालच एका चार वर्षांच्या मुलीचे लॉकेट हिसकावण्याच्या प्रयत्नात चोराने तिच्यावर कट्यारीने हल्ला केला. या चिमुकलीवर अजूनही उपचार सुरू आहेत. त्यापूर्वी पोलीस पुत्राची झालेली हत्या आणि आता एका भाजीपाल्याचे दुकान चालवणाऱ्या तरुणाचा झालेला निर्घृण खून. यामुळे सामान्य नाशिकर हादरून गेला आहे. पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. मृत तरुण राजू शिंदे फुलेनगरातल्या भराड वाडी येथे राहायचा. रात्री साडेबाराच्या सुमारास तो घरी जात होता. यावेळी दबा धरून बसलेल्या अज्ञातांनी त्याला अडवले. त्याच्या डोक्यात दगड घालून त्याला संपवले. पोलिसांना याची खबर लागताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत मारेकरी पसार झाले होते.
का झाला खून?
राजू शिंदे याचे भाजीपाला विक्रीचे छोटे दुकान होते. यावरचा त्याच्या कुटुंबाचा उर्दरनिर्वाह सुरू होता. वर्चस्ववादाच्या प्रकारातून हा खून झाल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे या आठवड्यात पोलीस पुत्राचा झालेला खूनही वर्चस्ववादातूनच झाल्याचे समोर आले. एकीकडे नाशिकमध्ये टोळी युद्ध, वर्चस्ववादातून खुनावर खून होतायत. मग पोलीस काय करतायत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आयुक्तांनी लक्ष घालावे
पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी सध्या फक्त नाशिकमध्ये हेल्मेटसक्ती हा एकमेवक विषय लावून धरलेला दिसतोय. त्यातच पोलिसांची इतकी ऊर्जा नष्ट होतेय की, दुसरीकडे गुन्हेगार मोकाट सुटलेत. यांना वेसण घालण्यासाठी आता आयुक्तांनी लक्ष घालावे. एकाच वेळी साऱ्या आघाड्यांवर लक्ष ठेवावे. इतकेच नाही, तर कुठले प्रकरण कुठवर ताणावे आणि कोणती मोहीम जास्त लाभदायक याचाही विचार करावा. एकीकडे शहरात खुनामागून खून होतायत आणि पोलीस भलत्याच कामात गुंतलेले, असे होऊ नये म्हणजे मिळवले, अशी प्रतिक्रिया दक्ष नाशिककरांमध्ये उमटत आहे.
कर्तृत्वाने सांभाळला गावचा कारभार, पण सासुरवासाची ठरली शिकार; महिला सरपंचाची विष पिऊन आत्महत्या