नाशिक : बांधकाम सुरू असतांना अनेक ठिकाणी नियमांचे पालन केले जात नाही. विशेष म्हणजे त्याकडे स्थानिक प्रशासनही दुर्लक्ष करत असते. त्यामुळे अनेकदा अपघात होत असतात. बिल्डरच्या चुकांमुळे अनेकांचा नाहक बळी गेला आहे. अशीच घटना गंगापूर शिवारातील ध्रुवनगरमध्ये सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी एका दहा वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे. त्यावरून गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपूर्व बिल्डर्स ॲन्ड डेव्हलपर्सचे अपूर्व राजेंद्र तोंडूलकर याच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून बांधकाम व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. अपूर्व बिल्डर्स ॲन्ड डेव्हलपर्स ज्या ठिकाणी काम सुरू आहे तिथे नियमांचे पालन केले नसल्याची बाबही समोर आल्याने नाशिकमध्ये उलटसुलट चर्चा होऊ लागल्या आहे.
अशी घडली घटना
अपूर्व बिल्डर्स ॲन्ड डेव्हलपर्सच्या नवीन इमारतीचे काम सुरू आहे. त्याठिकाणी लिफ्टसाठी खड्डा खोदण्यात आले आहे. तो पूर्ण पाण्याने भरलेला स्थितीत होता. सुभाष भागवत यांचा मुलगा यश भागवत खेळत होता. खेळता खेळता तो पाण्यात पडला त्यावेळी त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यामध्ये यशचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.
बांधकामाच्या ठिकाणी नियमांचे उल्लंघन
यश भागवतच्या मृत्यूनंतर बिल्डरने बांधकामाच्या वेळी अनेक बाबींकडे दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे. बांधकाम करतांना संशयित बिल्डर राजेंद्र तोंडूलकर यांनी चहू बाजूने शेड केलेले नाहीत. सुरक्षा रक्षकही नेमलेला नाही. लिफ्टसाठी केलेल्या खड्ड्याभोवती सुरक्षेच्या दृष्टीने कुठल्याही उपाययोजना केलेल्या नाहीत.
या कारणामुळे बिल्डरवर गुन्हा
बांधकामाच्या ठिकाणी नियमांचे पालन करण्यात आलेले नाही. आणि हीच बाब बालकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरली आहे. त्यामुळे गंगापूर पोलीस ठाण्यात बालकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याने शहरातील बिल्डर क्षेत्रात खळबळ उडाली असून उलटसुलट चर्चा होऊ लागली आहे.