चेन्नई : चेन्नईतून (Chennai) एक धक्कादायक बातमी समोर येतेय. एका अकरावीत (11th Student) शिकणाऱ्या मुलीनं आत्महत्या (Suicide) केली आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये (Suicide Note) या मुलीनं नमूद केलेल्या बाबींनी एकच खळबळ उडाली आहे. ना शिक्षक, ‘ना कुटुंबीय, मुलींसाठी कोणतीच जागा आता सुरक्षित राहिलेली नाही’, असं आत्महत्या केलेल्या मुलीनं आपल्या नोटमध्ये लिहिलंय.
चेन्नईत एक कुटुंब आपल्या मुलीसह राहत होतं. त्यांची मुलगी अकरावीत शिकत होती. शनिवारी ही मुलगी छताला लटकलेली आढळल्यानं घरात एकच खळबळ उडाली. दरम्यान, आता पोलीस तपासात या मुलीची सुसाईड नोट समोर आली आहे. या सुसाईड नोटमध्ये या मुलीनं धक्कादायक गोष्टी लिहून ठेवल्या होत्या. या मुलीनं आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिलंय की, ….
‘Stop Sexual harassment’ शिक्षक असोत वा कुटंबीय, कुणावरही विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती आता शिल्लक राहिली नाहीए. मुलींसाठी कोणतीच जागा सुरक्षित नाही. फक्त आईचा गर्भ किंवा पाताळ, याच जागा फक्त मुलींसाठी सुरक्षित राहिल्यात.
मुलीनं आत्महत्या केल्याचं पाहून तिच्या आईवडिलांनाही मोठा धक्का बसलाय. त्यांनी तातडीनं पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास केला असता, त्यांनी मुलीच्या रुपमध्ये सुसाईड नोट आढळून आली होती.
आत्महत्येच्या घटनेनंतर पोलिसांनी या मुलीच्या मित्रांकडे चौकशीही केली. या चौकशीनंतर धक्कादायक बाब समोर आली. आत्महत्या केलेल्या मुलीनं आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नातं तोडलं होतं. ती एकटीच राहायची. शिवाय कोणत्यातरी कारणामुळे या मुलीच्या मनात भावनिक गुंतागुंता होऊन ती अनेक दिवसांपासीन अस्वस्थ होती. नको नको ती स्वप्न पडून या मुलीची झोपही उडाल्याचं तिनं आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिलंय. अभ्यास करण्याची, शिकण्याची कोणतीच उमेद न राहिल्याचंही तिनं सुसाईट नोटमध्ये म्हटलंय.
एकूणच या धक्कादायक आणि गूढ आत्महत्येनंतर पोलिसांचीही आव्हानं वाढली आहेत. या मुलीनं आत्महत्या केली, की तिला आत्महत्या करण्यासाठी भाग पाडण्यात आलं, याचा पोलीसही कसून शोध घेत आहेत. याप्रकरणी पुढील तपासासाठी पोलिसांनी 4 शोध पथकं तयार केली असून त्यांच्यामार्फत पुढील चौकशी सुरु आहे. मात्र अजूनतरी मुलीच्या आत्महत्येचं नेमकं कारण समोर येऊ शकलेलं नाही.