चेन्नई : खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात चेन्नईमध्ये 32 वर्षीय अभियंत्याला प्राण गमवावे लागले. मोहम्मद युनूस याला बाईकने कामावर जात असताना अपघात झाला होता. ही घटना सोमवार 1 नोव्हेंबर रोजी सकाळी पावणे नऊ वाजताच्या सुमारास घडली. तामिळनाडूच्या चेन्नई शहरातील सैदापेठ येथील चिन्नमलाई परिसरातील अण्णा सलाई येथे हा अपघात झाला. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.
नेमकं काय घडलं?
अपघात स्थळाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये बाईकस्वार मोहम्मदची दुचाकी खड्ड्यात आदळल्यानंतर त्याचा तोल गेल्याचं दिसत आहे. त्याची बाईक डावीकडून जाणाऱ्या सिटी बसकडे कलली. पुढच्या सेकंदालाच युनूस आणि त्याची बाईक घसरली आणि बसच्या मागील चाकाखाली तो चिरडला गेला. यामध्ये मोहम्मदचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघाताच्या वेळी त्याने हेल्मेट घातले होते.
संबंधित बस बसंत नगरहून चिन्नमलाई मार्गे वडापलानीला जात असताना ही घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच गिंडी वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ट्रॅफिक इन्व्हेस्टिगेशन डिव्हिजनने तपासासाठी घटनास्थळावरून सीसीटीव्ही फूटेज तपासले, असे वृत्त पुथियाथलाईमुराई टीव्हीने दिले आहे.
बस चालकाला अटक
दरम्यान, खड्ड्यांमुळे तरुणाचा तोल गेला आणि तो बसच्या चाकाखाली आला असला तरी सिटी बसचा चालक थेवराजा याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर भारतीय दंड संहिता आणि मोटार वाहन कायद्याच्या अन्वये निष्काळजीपणा आणि रॅश ड्रायव्हिंगमुळे मृत्यूस जबाबदार ठरल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नांगनाल्लूर येथील रहिवासी असलेला युनूस एका खासगी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होता. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रॉयपेट्टा सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला.
पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडल्याचे सांगण्यात येत आहे. योगायोगाने अपघाताच्या वेळीही पाऊस पडत होता. अपघात झाला त्या रस्त्याची देखभाल करणार्या तामिळनाडू महामार्ग विभागाने दुचाकीस्वाराच्या मृत्यूनंतर खड्डे वाळूने भरले.
पाहा व्हिडीओ :
32 yr old Mohammad Yunus, a software engineer was killed in Anna Salai, Chennai, when he lost balance of his bike because of pothole and came under a government bus. pic.twitter.com/OH6Mn4G5ue
— Mugilan Chandrakumar (@Mugilan__C) November 1, 2021
संबंधित बातम्या :
एक खड्डा चुकवत असताना दुसऱ्या खड्ड्यात पडून मृत्यू; ठाण्यातील घोडबंदर येथे विचित्र अपघात
बदलापूरहून मुरबाडकडे जाणाऱ्या रस्त्याची चाळण, रस्त्यावर 10 फूट लांबीचे खड्डे, वाहन चालकांची कसरत