रांची : जावा-जावांच्या भांडणात नवजात अर्भकाचा बळी गेल्याचं पाहायला मिळत आहे. नुकतंच जगात पाऊल ठेवलेल्या अवघ्या चार दिवसांच्या बाळाची धाकट्या काकीने हत्या केली. छत्तीसगडमधील बालौदाबाजारात घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
धाकट्या आणि मोठ्या जावांमधील मत्सर आणि हेवेदाव्यांमुळे 4 दिवसांच्या नवजात बालकाचा मृत्यू झाला. दोघांमध्ये इतके टोकाचे भांडण झाले, की काकीने बाळाला विहिरीत फेकले. बालोदाबाजार जिल्ह्यातील कासडोल पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पिकरी गावात हा अंगाचा थरकाप उडवणारा प्रकार घडला.
नेमकं काय घडलं?
संजना निषाद नावाच्या महिलेने तिच्याच मोठ्या दीर-जावेच्या 4 दिवसांच्या बाळाची निर्घृण हत्या केली. निष्पाप लेकराला अंगणात घातलेल्या खाटेवर झोपवून आई घरच्या कामात व्यस्त होती. जेव्हा ती परत आली, तेव्हा तिला बाळ अंथरुणावर कुठेच सापडले नाही. तिने इकडेतिकडे बाळाचा शोध घेतला, पण ते कुठेच न सापडल्यामुळे तिने ताबडतोब कासडोल पोलीस स्टेशन गाठले.
बाळाचा मृतदेह घराच्या अंगणातील विहिरीत
बाळ गायब झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. गावात अर्भकाचा शोध सुरु केला. शोधाशोध सुरु असताना मुलाचा मृतदेह घराच्या अंगणाला लागून असलेल्या विहिरीत आढळला. हा खून असल्याचं ताडायला कासडोल पोलिसांना जराही वेळ लागला नाही.
मत्सरापोटी निष्पाप लेकराचा बळी
संशयाच्या आधारावर बाळाची काकी संजनाची चौकशी करण्यात आली. त्यावेळी तिने आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हत्येमागे जाऊबाईंचा मत्सर हे कारण तिने सांगितले. सध्या पोलीस आरोपी संजनाचा ताबा घेऊन तिला तुरुंगात पाठवण्याची तयारी करत आहेत.
भावालाही मुलगी झाल्याने वहिनीची हत्या
दुसरीकडे, अंगावर तेल फेकून विवाहितेची जाळून हत्या करण्यात आल्याची घटना काही दिवसांपूर्वी यवतमाळमध्ये समोर आली होती. धक्कादायक म्हणजे महिलेच्या नणंदेनेच तिची हत्या केल्याचे उघडकीस आले होते. भावालाही मुलगी झाल्यामुळे आता माहेरी आपल्या लेकीचे लाड कोण करणार? या असूयेच्या भावनेने नणंदेने वहिनीला जाळल्याचा आरोप होता.
यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यातील दातपडी गावात ही घटना घडली होती. विवाहितेच्या अंगावर तेल टाकून तिला जाळून मारल्याचा प्रकार समोर आला होता. मोनिका गणेश पवार असे मयत महिलेचे नाव होते. मोनिकाच्या नणंदेनेच तिची हत्या केली होती.
नेमकं काय घडलं?
पहिल्या मुलानंतर गणेश पवारला मुलगी झाली, मात्र भावाला मुलगी झाल्याने, माहेरी आता आपल्या मुलीचे लाड होणार नाहीत, या कारणामुळे आरोपी नणंद कांता संजय राठोड चरफडत होती. त्यामुळेच तिने तेल टाकून वहिनीला जाळून मारले, अशी तक्रार महिलेच्या नातेवाईकांनी केली होती. पांढरकवडा पोलिसांनी नणंद कांता राठोड हिच्याविरुद्ध कलम 302 अन्वये गुन्हा दाखल केला होता.
संबंधित बातम्या :
भावालाही मुलगी झाली, आपल्या लेकीचे लाड कोण करणार? यवतमाळमध्ये नणंदेने वहिनीला जाळले
19 वर्षीय तरुणाचा राग, सोसायटीच्या दोन सुरक्षा रक्षकांनी पोटात चाकू खुपसला, मीरा भाईंदर हादरलं !
दिरासोबत राहण्यासाठी आधी पतीची हत्या, आता वहिनीने त्याच दिराचाही जीव घेतला