प्रसिद्ध क्रिकेटपटू हार्दिक पांड्याचा सावत्र भाऊ वैभव पांड्याचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. मुंबई पोलिसांनी वैभव पांड्याला अटक केली आहे. हार्दिक आणि त्याचा सख्खा भाऊ क्रृणाल पांड्याची फसवणूक केल्याप्रकरणी वैभव पांड्याला अटक करण्यात आली आहे. हार्दिक व क्रृणालची 4.25 कोटी रुपयांना फसवणूक केल्याचा वैभववर आरोप आहे. ‘गंभीर आर्थिक गुन्ह्यात’ गुंतलेली रक्कम ‘मोठी’ आहे आणि चौकशी प्राथमिक टप्प्यावर असल्याने, अर्जदाराची जामिनावर सुटका होऊ शकत नाही, असं न्यायालयाने निरीक्षण नोंदवलं. अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी एस.पी.शिंदे यांनी 10 मे रोजी आदेश दिला. त्याची प्रत बुधवारी उपलब्ध झाली.
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनुसार पांड्या बंधुंनी वैभव सोबत मिळून 2021 मध्ये पॉलिमर बिझनेसची स्थापन केली. या कंपनीच दैनंदिन कामकाज वैभव बघायचा. या दरम्यान वैभवने करार मोडला व पॉलिमरच्याच व्यवसायात श्वेता ट्रेडिंग कंपनी सुरु केली. हे करताना त्याने हार्दिक आणि क्रृणाल दोघांना अंधारात ठेवलं. त्यानंतर फिर्यादीनुसार, वैभवने मर्यादित दायित्व भागीदारी (LLP) फर्ममधून पैसे स्वतःच्या फर्मकडे वळवले आणि अखेरीस LLP मधील नफा कमी झाला.
कशा प्रकारे केली फसवणूक?
ईओडब्ल्यूने दावा केला आहे की वैभवने एलएलपीमधील नफ्याचा वाटा फसवणुकीने वाढवला. पांड्या बंधुंना त्याबद्दल माहिती नव्हती. त्याने एलएलपी पूरक करारावर त्यांच्या खोट्या सह्या केल्या आणि त्यांचा हिस्सा 40% वरून 33.33% पर्यंत कमी केला आणि स्वतःचा हिस्सा 20 वरुन 33.33 %. टक्क्यापर्यंत वाढवला. फसवणूक, गुन्हेगारी उद्देशाने विश्वास मोडणं, कारस्थान रचण या आयपीसीच्या कलमांखाली अटक करण्यात आली आहे. यावर्षी 8 एप्रिलला मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने वैभव पांड्याला अटक केली. EOW ने वैभवच्या जामीन अर्जाला विरोध केला होता.