लखनऊ : नव तंत्रज्ञान आलं की गुन्ह्यातही वाढ होते. दहा वर्षापूर्वी जेव्हा एटीएम आणि क्रेडिट कार्ड आले. तेव्हा लोकांना त्याची अधिक माहिती नव्हती. त्यामुळे ठकसेनांनी लाखो लोकांची फसवणूक केली. एवढ्या प्रमाणावर ही फसवणूक होती की त्यावर जामताडा नावाची वेब सीरिजही बनली. आता या ठकसेनांनी सेक्सटॉर्शनला आपलं शस्त्र बनवलं आहे. विशेष म्हणजे ठकसेनांच्या या सेक्स्टॉर्शनच्या जाळ्यातून पोलीसही सुटू शकले नाहीत. गेल्या वर्षभरात उत्तर प्रदेशातील 150 हून अधिक पोलीस या सेक्स्टॉर्शनचे बळी पडले आहेत.
पीडित लोक या प्रकरणाची तक्रार करत नाहीत. त्यामुळे आरोपींचं फावत असल्याचं दिसून आलं आहे. लाज वाटत असल्याने लोक पोलिसांकडे जात नाहीत. चौकशीत सर्व माहिती द्यावी लागेल असं या लोकांना वाटतं. त्यामुळे आरोपींना व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून लोकांची फसवणूक करणं सोपं वाटतं. सध्या प्रत्येकजण इंटरनेटवर फेसटाइम आणि व्हॉट्सअप कॉलच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधून असतो. त्यामुळेच आरोपीही व्हिडीओ कॉल करून लोकांना सेक्स्टॉर्शनच्या जाळ्यात ओढताना दिसत आहेत.
सेक्स्टॉर्शन प्रकरण हे ऑनलाइन फसवणुकीसारखच आहे. पीडित व्यक्तीचे खासगी व्हिडीओ आणि फोटो इंटरनेटवर लीक करण्याची धमकी दिली जाते. त्या बदल्यात पैसे वसूल केले जातात. पीडित व्यक्तीला काही सेकंदासाठी व्हॉट्सअपवर एक व्हिडीओ कॉल येतो. त्यात एक तरुणी निर्वस्त्र होताना दिसते. त्यानंतर कॉल लगेच कट होतो. हा प्रकार स्क्रीन रेकॉर्डिंग अॅपच्या माध्यमातून रेकॉर्ड केला जातो. हा कॉल 30 सेकंदापर्यंत वाढवला जातो. त्यानंतर हा व्हिडीओ पीडित व्यक्तीचे कुटुंब आणि नातलगांमध्ये लीक करण्याची धमकी दिली जाते. त्यानंतर पैसे मागितले जातात. पीडित व्यक्तीला वारंवार पैसे मागितले जातात.
सूत्रांच्या माहितीनुसार, पोलीस अधिकारी साधारणपणे हा प्रकार शेअर करत नाहीत. कारण कायदेशीर तरतुदीनुसार त्यांना निलंबित केलं जाऊ शकतं. केवळ उत्तर प्रदेशातील पोलिसांच्या बाबतीतच हा प्रकार होत नाही तर इतर राज्यातील पोलिसांच्या बाबतही हा प्रकार होतो. सप्टेंबर 2022 मध्ये एका महिलेने कर्नाटकाच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांना व्हॉट्सअपवर कॉल केला आणि कपडे उतरवण्यास सुरुवात केली. पोलीस अधिकाऱ्याने तात्काळ फोन कट केला. पण एव्हाना या महिलेने हा प्रकार रेकॉर्ड करून ठेवला होता. त्यानंतर तिने पैशाची मागणी सुरू केली. पीडित व्यक्तीने पोलिसांकडे या प्रकरणाची तक्रार दिली.
केवळ पोलीसच नव्हे तर राजकारणीही या सेक्स्टॉर्शनच्या जाळ्यात सापडले आहेत. कर्नाटकातील भाजपचे आमदार जीएच थिप्पारेड्डी यांनी पोलिसात तक्रार केली होती. एका व्यक्तीने व्हॉट्सअप कॉल केला आणि स्वत: नग्न झाला, अशी तक्रार भाजप नेत्याने गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये केली होती.
लोकांना ब्लॅकमेल करण्यासाठी अशा प्रकारचे कॉल केले जातात. बर्नर सॉफ्टवेअर आणि बनावट प्रोफाईलच्या माध्यमातून ही फसवणूक केली जाते. बर्नर फोन अत्यंत स्वस्त आहे. यावरून एका तात्पुरत्या डिस्पोजेबल नंबरवरून कॉल करता येतो. गुन्हा केल्यानंतर हा फोन तोडून फेकून देता येतो, असं पोलिसांनी सांगितलं.