चंदिगढ : लग्नानंतर अवघ्या आठच दिवसात नवविवाहित पत्नीला सोडून नवरोबा कॅनडाला पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. हरियाणातील सिरसा जिल्ह्यात ही धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाच्या बेडीत अडकवून विवाहितेला फसवणाऱ्या भामट्याला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
काय आहे प्रकरण?
शुक्रवारी संध्याकाळी एका नवविवाहित तरुणीने सिरसाच्या पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली. 6 महिन्यांपूर्वी कॅनडामध्ये राहणाऱ्या एका तरुणाशी आपली ऑनलाईन भेट झाली. त्यानंतर दोघांमध्ये गप्पा सुरु झाल्या. दोन्ही कुटुंबीयांच्या संमतीने दोघांचा साखरपुडा झाल्याचं तिने सांगितलं.
18 नोव्हेंबर रोजी संबंधित तरुण सिरसा येथे आला, त्यानंतर दोन्ही कुटुंबीयांच्या संमतीने त्यांचे लग्न झाले. त्यानंतर सासरच्या मंडळींकडून त्यांच्याकडे अचानक 30 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. त्यामुळे आपल्याला संशय आला. तरुण आणि त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही. त्यानंतर त्यांनी या प्रकरणी सिरसा पोलिसात तक्रार दाखल केली.
दिल्ली विमानतळावरुन आरोपीला बेड्या
सिरसा सिव्हिल लाईन पोलिस स्टेशनचे प्रभारी रामनिवास यांनी सांगितले की, सिरसाच्या न्यू हाऊसिंग बोर्डमध्ये राहणाऱ्या एका तरुणीने शुक्रवारी संध्याकाळी कुटुंबासह सिरसा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार दिली. या प्रकरणी पोलिस अधीक्षकांनी तातडीने कारवाई केली. सिरसा सिव्हिल लाईन पोलिस स्टेशनने एक टीम दिल्ली विमानतळावर रवाना केली. आरोपी तरुण साहिल खुराणा याला विमानतळावरून अटक करण्यात आली. उर्वरित आरोपींनाही लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
आई-वडिलांसह भावंडांवरही गुन्हा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी यांची सुमारे 6 महिन्यांपूर्वी ऑनलाईन भेट झाली होती, त्यानंतर दोघांच्या कुटुंबीयांच्या संमतीने त्यांनी साखरपुडा केला. नुकतेच दोघांचेही लग्न झाले, मात्र सासरच्यांनी तिच्याकडे 30 लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप तरुणीने केला असून, या प्रकरणी तरुणासह त्याचे आई-वडील, भाऊ, बहीण आणि मेव्हणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी तरुणाला दिल्ली विमानतळावरून अटक करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या :
लिफ्ट देण्याचा बहाणा, निर्जनस्थळी नेत महिलांची लूट, पुण्यातील भामटा अखेर जेरबंद
मृतदेह नेणारी गाडी ट्रकवर आदळली, भीषण अपघातात 17 जणांचा मृत्यू, अनेक जण गंभीर
अपघातात पाय गेले, मेकॅनिकने लावला दुचाकी चोरण्याचा सपाटा, 6 महिन्यात 13 वाहने चोरली