मुंबई : पॉर्न साईटवर एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा नंबर अपलोड करत तिला कुरियरद्वारे सेक्स टॉईज पाठवल्याच्या आरोपाखाली मुंबईतील मालाड पोलिसांनी एका 26 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. लैंगिक संबंधांची मागणी धुडकावल्याच्या रागातून सूड उगवण्यासाठी तरुणाने हे पाऊल उचलल्याचा आरोप आहे. लैंगिक संबंधांची मागणी करणाऱ्या व्यक्तींचे फोन येऊ लागल्यानंतर तरुणीने फेब्रुवारीमध्ये पोलिसात तक्रार दाखल केली होती.
काही अज्ञात व्यक्तींनी तिला कुरियरद्वारे सेक्स टॉईज पाठवले होते. या सर्व ऑर्डर कॅश-ऑन-डिलिव्हरी तत्त्वावर देण्यात आल्या होत्या आणि पॅकेजेसवर तिचा मोबाईल नंबर होता. मात्र आरोपींचा शोध घेताना पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं.
काय आहे प्रकरण?
तक्रारदार तरुणीने सांगितले, की कुठलीही ऑनलाईन ऑर्डर न करताच काही पार्सल आपल्या घरी येत होती. मात्र सुरुवातीला तिला कुठलाच संशय आला नव्हता. कोणाकडून तरी चूक झाली असेल, अशा समजुतीतून तिने काही पार्सल तशीच परत पाठवली. मात्र हा प्रकार नियमित घडू लागला, तेव्हा तिने त्यापैकी एक पार्सल उघडले, त्यावेळी तिला धक्काच बसला. कारण पार्सलच्या आत एक सेक्स टॉय होता, तर बॉक्सवर तिचंच नाव, पत्ता आणि फोन नंबरही होते. त्यानंतर तिने मालाड पोलिसांशी संपर्क साधून तक्रार दाखल केली. वरिष्ठ निरीक्षक डी लिगाडे, एपीआय विवेक तांबे आणि अशोक कोंडे यांच्या देखरेखीखाली सायबर सेलकडून तपास सुरू करण्यात आला.
प्रत्येक पार्सल वेगवेगळ्या आयपी अॅड्रेसने बूक
पोलिसांनी सांगितले की पार्सल ट्रेस करणे कठीण होते, कारण ते सर्व कॅश ऑन डिलिव्हरी तत्त्वावर नोंदवण्यात आले होते. “आम्ही कुरियर कंपनीशी संपर्क साधला आणि त्यांना ही ऑर्डर करणाऱ्याचा माग काढण्यास सांगितले. त्याच वेळी पॉर्न साईटवर मुलीचा नंबर अपलोड करणाऱ्या व्यक्तीचा आयपी अॅड्रेसही आम्ही शोधायला सुरुवात केली” असे मालाड पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. तपासात समोर आले, की आरोपींनी पार्सल बुक करण्यासाठी व्हीपीएन कनेक्शन वापरले आणि त्यातील प्रत्येक पार्सल वेगवेगळा आयपी अॅड्रेस वापरुन बूक करण्यात आले होते.
तरुणीने मागणी नाकारल्याचा राग
“आम्ही इंटरनेट सेवा प्रदात्याशी संपर्क साधला आणि ज्यांनी त्या वेबसाईटला भेट दिली त्यांचे IP अॅड्रेस मिळवले. आम्हाला 500 पेक्षा जास्त IP अॅड्रेस मिळाले. मग आम्ही त्या IP अॅड्रेसची यादी मागितली, ज्यावरुन सेक्स टॉयसाठी ऑर्डर देण्यात आल्या होत्या. अशा प्रकारे आम्ही आरोपीने वापरलेला एक IP अॅड्रेस शोधून काढला आणि त्याचा शोध घेतला. त्यानुसार मुंबईतून 26 वर्षीय कुणाल अंगोळकर या आरोपीला अटक करण्यात आली आहे. तक्रारदार मुलीने आपली मागणी नाकारल्यानंतर तो कसाबसा तिचा नंबर मिळवण्यात यशस्वी झाला आणि त्याने तो अश्लील वेबसाईटवर अपलोड केला. त्याचप्रमाणे तिच्या घरी सेक्स टॉईज पाठवू लागला, असे समोर आले आहे.
संबंधित बातम्या :
धावत्या कारच्या खिडकीत लटकत तरुणांची स्टंटबाजी, व्हिडीओ मुंबई पोलिसांच्या हाती
‘अॅमेझॉन’मध्ये पार्ट टाईम जॉब, भरघोस कमिशनचं आमिष, मुंबईकर तरुणाची 2.58 लाखांना फसवणूक