मुंबई : मुंबईतील मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका 31 वर्षीय महिला डॉक्टरला 53,000 रुपयांचा गंडा बसला. 400 रुपयांच्या बर्थडे केकची ऑनलाईन ऑर्डर देण्याचा प्रयत्न करताना महिलेची फसवणूक झाली. सायबर गुन्हेगाराने बेकरीचा कर्मचारी असल्याचे भासवून पीडितेला फसवल्याचा आरोप आहे.
काय आहे प्रकरण?
मुंबईतील डीबी मार्ग पोलिस स्टेशनमध्ये 10 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार ती गिरगावमधील एका मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये काम करते. तिला आपल्या मैत्रिणीच्या वाढदिवसानिमित्त केक मागवायचा होता. दिवसभराचे काम आटोपून 7 डिसेंबरच्या रात्री मैत्रिणीचा बर्थडे साजरा करण्यासाठी केक घेण्याचा तिचा प्लॅन होता. सात तारखेला कामावर असताना तिने गिरगाव येथील मेरवान बेकरीचे काँटॅक्ट नंबर गुगलवर सर्च केले.
सायबर गुन्हेगार वाईन शॉप, बेकरी, ऑनलाईन शॉपिंग पोर्टल, बँकांच्या ग्राहक सेवा, कुरिअर सेवा इत्यादींसाठी स्वतःचे नंबर गुगलवर देतात, याची तिला माहिती नव्हती. कारण गेल्या काही वर्षांत शेकडो लोकांना अशाप्रकारे विविध आरोपींनी गंडा घातला आहे.
बेकरी कर्मचारी असल्याचं भासवून लूट
महिलेने एका नंबरवर कॉल केला आणि बेकरीचा कर्मचारी असल्याचे भासवणाऱ्या आरोपीने तिच्याशी संवाद साधला. त्याने तिला केक बुक करण्यासाठी 400 रुपये आगाऊ भरण्यास सांगितले. तिने पेमेंट केले त्यानंतर त्याने तिला पावती घेण्यासाठी आणखी 20 रुपये भरण्यास सांगितले.
53,000 रुपयांचा गंडा
20 रुपये भरल्यानंतर, त्याने तिला पुन्हा नोंदणी फी म्हणून 15 हजार 236 रुपये भरण्यास सांगितले, ज्याचा लवकरच परतावा दिला जाईल, असे त्याने सांगितले. डॉक्टर महिलेने सुरुवातीला नाराजी दर्शवली, पण अखेर त्याच्यावर विश्वास ठेवून रक्कम दिली. काही वेळातच, त्याने एक चूक झाल्याचे सांगत त्याने तिला आणखी 38 हजार 472 रुपये भरण्यास सांगितले. डॉक्टरने पुन्हा नाराजी दर्शवली, परंतु ते परत मिळतील, या विचाराने पेमेंट केले.
तिसऱ्या वेळी फसवणूक झाल्याचं समजलं
त्यानंतर आरोपीने तिला आणखी काही थातुरमातुर कारण सांगून 50,000 रुपयांचे तिसरे पेमेंट करण्यास सांगितले. यावेळी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच डॉक्टर महिलेने कॉल कट केला. तिने आपल्या बँकेला या व्यवहारांबद्दल सावध केले आणि त्यानंतर तक्रार नोंदवण्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यात संपर्क साधला.
संबंधित बातम्या :
Vinod Kambli | माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला ऑनलाईन गंडा, KYC च्या नावे 1.14 लाखांची लूट