नागपूर : व्हॅाट्सॲपच्या ग्रुप (WhatsApp group) ॲडमीनची ‘पॅावर’(admin’s ‘Power) वाढणार आहे. यासाठी व्हॅाट्सॲप लवकरंच नवं फिचर लाँच करणार आहे. या नव्या फिचरने व्हॅाट्सॲपचा ग्रुप ॲडमीन आपल्या ग्रुपमधील कुठल्याही सदस्याचा मॅसेज (Message) हवा तेव्हा डिलिट करु शकतो. कार्यालयीन व्हॅाट्सॲप ग्रुप असो, शैक्षणिक, मित्र मंडळींचा किंवा फॅमिली कट्टा… कुठलाही आपत्तीजनक किंवा अश्लील मॅसेज आता व्हॅाट्सॲपच्या ग्रुप ॲडमीनला लगेच डिलिट करता येणार आहे. व्हॅाट्सॲप चालवणारी ‘मेटा’ कंपनी या नव्या फिचरवर काम करत आहे. या नव्या फिचरची चाचणी सुद्धा झालीय. लवकरचं हे फिचर लाँच करण्यात येणार आहे. भारतात सध्या 53 कोटींच्या वर म्हणजेच 45 टक्क्यांपेक्षा जास्त जनता व्हॅाट्सॲपचा वापर करतात. हे सर्व युजर्स कुठल्या ना कुठल्या व्हॅाट्सॲप ग्रुपशी जुडले आहेत. या ग्रुपच्या ॲडमीनला व्हॅाट्सॲपच्या नव्या फिचरचा चांगलाच फायदा होणार आहे.
एखाद्या ग्रुपमधील सदस्यांनी टाकलेला आपत्तीजनक मॅसेज डिलिट करण्यासाठी ॲडमीनला संबंधित सदस्याला विनंती करावी लागायची. पण आता व्हॅाट्सॲपच्या नवीन फिचरमुळे ग्रुप ॲडमीनला तो मॅसेज कधीही डिलिट करता येणार आहे. व्हॅाट्सॲपवर व्हायरल होणाऱ्या अफवांमुळे समाजात तेढ निर्माण व्हायची, अशाच प्रकरणात अनेक वेळा ग्रुप ॲडमीनवर पोलिसांनी गुन्हेही दाखल केलेत. पण येऊ घातलेल्या या नव्या फिचरमुळे सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने व्हॅाट्सॲपचं सकारात्मक पाऊल आहे, असं मत सायबर तज्ज्ञ अजित पारसे यांनी व्यक्त केलं आहे.
व्हॅाट्सॲपंच्या नव्या फिचरबाबत एक स्क्रिनशॅाट व्हायरल झाला आहे. एखाद्या व्हॅाट्सॲप ग्रुपच्या ॲडमीनने ग्रुपमधील सदस्यांचा मॅसेज डिलिट केल्यास “संबंधित मॅसेज ग्रुप ॲडमीन यांनी डिलिट केला आहे” अशाप्रकारचा मॅसेज तिथे दिसणार आहे. 2021 मध्ये, मुंबई उच्च न्यायालयानेही व्हॉट्सअॅपच्या ग्रुप अॅडमीनच्या विद्यमान शक्तीबद्दल चिंता व्यक्त केली होती. सध्या व्हॉट्सअॅपच्या ग्रुप अॅडमीन सदस्यांना ग्रुपमध्ये जोडू आणि काढू शकतात. ॲडमीनकडे ग्रुपमधील चॅटवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार नाही. आता नव्या फिचरमुळे ग्रुप ॲडमीनला हे अधिकार मिळणार आहेत. व्हॅाट्सॲप आता रोजच्या कामकाजात गरजेची बाब बनलीय. सरकारी कार्यालयातंही आता व्हॅाट्सॲप मॅसेजला कार्यालयीन मान्यता देण्यात आली आहे. या सर्वांना व्हॅाट्सॲपच्या नव्या फिचर्सचा फायदा होणार आहे.