पुणे : 29 वर्षांपूर्वी विवाहितेने पतीकडून होणाऱ्या छळाला कंटाळून आपल्या अल्पवयीन मुलीसोबत आत्महत्या केली होती. या प्रकरणात आता पुणे सत्र न्यायालयाने महिलेचा पती आणि अन्य एका महिलेला दोषी मानत शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात मृत महिलेचा पती रामदास ढोंडू कलातकर याला तीन वर्षांच्या सक्तमजुरीची तर महिला भारती हिला सहा महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दरम्यान पुणे सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात आरोपींनी मुंबई हायकोर्टामध्ये देखील याचिका दाखल केली होती. मात्र उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निकाल कायम ठेवला आहे. पतीच्या छळाला कंटाळून आपल्या बहिणीने आत्महत्या केल्याची तक्रार विवाहितेच्या भावाने केली होती. हा खटला तब्बल 29 वर्ष चालला. 29 वर्षंनंतर या प्रकरणातील दोषींना शिक्षा सुनावण्यात आली आहे.
मृत पीडिता जनाबाई हिचा विवाह आरोपी रामदास ढोंडू कलातकर याच्यासोबत झाला होता. त्यांना दोन मुली देखील होत्या. परंतु पहिल्या मुलीचा अकालीच मृत्यू झाला होता. दुसऱ्या बाळांतपणासाठी जनाबाई आपल्या माहेरी गेली होती, जेव्हा ती माहेरून घरी परतली तेव्हा तिला आपला पती दुसरीच महिला भारतीसोबत राहात असल्याचे आढळून आले. यावरून त्यांच्यामध्ये सातत्याने वाद होऊ लागले, अखेर जनाबाईने या सर्व प्रकाराला कंटाळून 9 ऑक्टोबर 1992 ला आत्महत्या केली होती, तीने आपल्या मुलीसह विहिरीत उडी मारून आपले जीवन संपवले. या प्रकरणी पीडितेचा भाऊ भानुदास दरेकर यांनी जनाबाईचा पती रामदास ढोंडू कलातकर आणि भारती या दोघांविरोधात छळ आणि आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला होता. आता तब्बल 29 वर्षांनंतर आरोपीला न्याय मिळाला आहे.
दरम्यान पुणे सत्र न्यायालयाने आरोपी पतीला तीन वर्षांची सक्त मजुरी तर भारती नावाच्या महिलेला सहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. पुणे न्यायालयाच्या या निर्णयाला आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने देखील आरोपींची शिक्षा कायम ठेवली आहे. उपलब्ध पुराव्यावरून जनाबाईचा छळ झाला तसेच तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यात आल्याचे सिद्ध होत आहे. सततच्या छळाला कंटाळूनच तिने आत्महत्या केली. त्यामुळे ही शिक्षा कायम ठेवली जात असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. दरम्यान आरोपींच्या वकिलाने शिक्षा कमी करण्यात यावी अशी विनंती न्यायालयात केली होती. मात्र वकिलांची ही विनंती देखील न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
मालेगावमध्ये पोतं भरून तलवारी सापडल्या…अन् पोलिसही गेले चक्रावून, नेमका काय डाव होता?