कुत्रे नेहमीच लोक आणि त्यांच्या घरांवर पहारा देत असतात. पण अनेकदा कुत्र्याशी संबंधित बातम्याही लोकांना आश्चर्यचकित करतात. याच प्रकरणात ग्रेटर नोएडामधून असाच एक प्रकार समोर आला आहे जिथे एका कुत्र्याच्या अचानक मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला आहे. सोसायटीत सर्वांची काळजी घेणाऱ्या एका कुत्र्याचा अचानक मृत्यू झाला. ही घटना सगळ्यांसाठीच इतकी धक्कादायक होती की आता हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले आहे.
खरं तर ही घटना दिल्लीला लागून असलेल्या ग्रेटर नोएडाची आहे. पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल केल्यावर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण ग्रेटर नोएडाच्या गौतमबुद्ध नगर आयुक्तालयाचे आहे. शनिवारी हा गुन्हा दाखल करण्यात आला. मून कोर्ट जेपी ग्रीन्स सोसायटीमध्ये या कुत्र्याला विष पाजल्याची घटना बुधवारी घडली. फिर्यादी पार्थ सेमवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीने जेवणात विष टाकले असून काळू नावाच्या या कुत्र्याचा मृत्यू झाला आहे.
हा कुत्रा प्रत्येकाची काळजी घेत होता आणि कुत्र्याची नसबंदी आणि लसीकरण या दोन्ही गोष्टी करण्यात आल्याचेही सांगण्यात आले. 15 तारखेला रात्री एक वाजता कुत्रा मृतावस्थेत आढळला. त्यानंतर कासना येथील शासकीय रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन करण्यात आले, त्याचा अहवाल येणे बाकी आहे. कुत्र्याला विष देऊन ठार मारण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.
सध्या पोलिसांनी फिर्यादीच्या माहितीच्या आधारे गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 429 आणि प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्याच्या कलम 11 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास अधिकारी देवेंद्रकुमार राठी यांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.