नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील शाहदरा जिल्हा पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह पाच सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. अवघ्या चारशे रुपयांवरुन झालेल्या वादातून पाच जणांनी तरुणाला भोसकल्याचा आरोप केला जात आहे. फैजल (20 वर्ष), आदित्य (19वर्ष) (दोघेही रा. शहीद नगर) फुरकान उर्फ वसीम (20 वर्ष) आणि अरुण चौहान (28 वर्ष) (दोघेही रा. जुनी सीमापुरी) अशी या आरोपींची नावे आहेत. सीमापुरी भागातील दोघा जणांच्या खुनाचा प्रयत्न केल्यासह तीन गुन्ह्यांची उकल केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेला चाकूही जप्त करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
डीसीपी (शाहदरा) आर. सत्यसुंदरम यांनी सांगितले की, 14-15 नोव्हेंबरच्या मध्यरात्री दिल्लीतील सीमापुरी भागात एका तरुणावर चाकूने वार केल्याची घटना घडली होती. शहीद नगर येथील फुरकान उर्फ मेंटल याने आपल्या साथीदारांसह हा हल्ला केल्याचा आरोप जखमी तरुणाचा भाऊ अमित याने केला होता.
सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे पोलिसांचा तपास
सीमापुरी पोलिसांनी हत्येचा प्रयत्न, दंगल यांच्याशी संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. या घटनेचा छडा लावण्यासाठी पोलिसांची अनेक पथके तैनात करण्यात आली होती. विशेष कर्मचाऱ्यांच्या पथकाने स्थानिक गुप्तचरांची मदत घेतली आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. त्या आधारे आरोपींची ओळख पटली.
सर्व आरोपी एकाच घरातून ताब्यात
पोलिसांनी सर्व आरोपींना सीमापुरी येथील एका घरातून ताब्यात घेतले. घर मालक अरुण चौहानलाही अटक करण्यात आली होती, जो प्राणघातक हल्ल्याच्या दुसऱ्या एका गुन्ह्यात वाँटेड होता. चौकशी दरम्यान आरोपींनी पीडित तरुणासोबत 400 रुपयांचा व्यवहार झाल्याचे सांगितले. यावरून भांडण झाले आणि फैसलने चाकूने हल्ला केला होता.
चौघेही सराईत गुन्हेगार
यापूर्वी 8 नोव्हेंबर रोजीही आरोपींनी साजिद (22 वर्ष) नावाच्या तरुणावर चाकूने हल्ला केला होता. त्यानंतर हे सर्व जण फरार झाले होते. फैसलवर यापूर्वीच सहा गुन्हे दाखल आहेत, तर अरुणवर दोन गुन्हे दाखल आहेत. चारही प्रौढ आरोपी छोट्या-मोठ्या नोकऱ्या करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
संबंधित बातम्या :
लहानग्याला वाचवण्यासाठी थोरल्याची उडी, सख्खे भाऊ तळ्यात बुडाले, क्षणात होत्याचं नव्हतं!
लग्नाची तारीख ठरली, मॉडेलवर बलात्कार, पीडिता गरोदर होताच नवरदेव पळाला
फेसबुकवरील मैत्री महागात, नगरमध्ये सरकारी कर्मचाऱ्याची 2 लाख 30 हजारांना फसवणूक