नवी दिल्ली : अपघात झाल्याचा बनाव रचत मदतीच्या बहाण्याने कारचालकांची लूट करणाऱ्या टोळीला पोलिसांनी गजाआड केलं आहे. रात्रीच्या वेळी निर्जन जागी एकट्या कारचालकांना शोधून एक महिला मित्राचा अपघात झाल्याचं भासवायची. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यासाठी मदत घेण्याच्या बहाण्याने कारचालकांचीच लूट केली जात असे. (Delhi Crime News Woman arrested with Thieves Gang for looting Man)
मित्र जखमी झाल्याचा बनाव
दिल्लीतील मालवीय नगर भागात लूटमारीच्या आरोपाखाली एक महिला आणि तिच्या दोघा साथीदारांना अटक करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी संबंधित महिला रस्त्यावर आपलं सावज शोधत असे. एकटा-दुकटा कार किंवा बाईकस्वार दिसला, तर ती त्याला मित्र किंवा नातेवाईक अपघातग्रस्त होऊन जखमी अवस्थेत पडल्याचं सांगत असे. एकटी महिला पाहून सहसा अनेक जण मदत करण्यास तयार होत असत.
मदतीला तयार झालेल्या व्यक्तींना घेऊन ती एका निर्जन स्थळी जात असे. तिथे तिचे दोन साथीदार आधीपासूनच दबा धरुन बसलेले असायचे. संधी साधून ते कारचालकाला लूटत असत.
तरुणाच्या तक्रारीनंतर लुटीची घटना उघड
11 जूनला मालवीय नगर पोलिसात रोहित तनेजा नावाच्या व्यक्तीने तक्रार दिली. आदल्या रात्री जवळपास 1 वाजता आपण मालवीय नगर भागात जेवण करुन घरी चाललो होतो. त्यावेळी साकेत कोर्ट भागात एका महिलेने थांबण्याची विनंती केली. तिने तिचा मित्र जखमी अवस्थेत पडल्याचं सांगितलं. तिची विनंती ऐकून आपण तिच्यासोबत गेलो, मात्र तिथे आधीपासून दोघं जण उपस्थित होते. आपल्याकडे असलेली 10 हजार रुपयांची रोकड, क्रेडिट कार्ड आणि मोबाईल घेऊन आरोपी रिक्षातून पसार झाले, असा दावा त्याने तक्रारीत केला.
महिलेसह तिघांना बेड्या
रोहितच्या तक्रारीनंतर पोलिसांनी एफआयआर दाखल केला. आरोपींना पकडण्यासाठी एक टीम तयार केली. परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासून रिक्षाचा नंबर त्यांनी ट्रॅक केला. त्यानंतर संगम विहार भागात महिलेसह तिघा आरोपींना अटक केली. चंदन, वर्षा आणि रोहित अशी तिघांची नावं आहेत. पोलिसांनी रोकड आणि रिक्षा जप्त केली आहे. अशाप्रकारे या टोळीने किती जणांना लुटलं, याचा पोलीस शोध घेत आहेत.
संबंधित बातम्या :
तो दिल्लीत आधी वेटर होता आणि चीनमध्ये फिल्मस्टार, वाचा एका स्टारची अफलातून कहाणी
(Delhi Crime News Woman arrested with Thieves Gang for looting Man)