नवी दिल्ली: संपूर्ण देशात नव वर्षाचं जल्लोषात स्वागत केलं जात असतानाच दुसरीकडे दिल्ली मात्र एका धक्कादायक कृत्याने हादरून गेली आहे. श्रीमंत बापांच्या पाच धेंडांनी एका तरुणीच्या स्कुटीला धडक मारली. त्यानंतर तिला चार किलोमीटरपर्यंत फरफटत नेलं. त्यात या तरुणीच्या अंगावरील कपडे फाटले. अंगावरची चामडी निघाली अन् प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने या तरुणीचा मृत्यू झाला. दिल्लीच्या प्रचंड थंडीत भररात्री रस्त्यावर हे कृत्य घडलं. या धक्कादायक घटनेने संपूर्ण दिल्ली हादरून गेली आहे. दिल्लीत वारंवार महिला अत्याचाराच्या घटना घडत आहेत. केवळ अत्याचाराच्याच नव्हे तर क्रूर अत्याचाराच्या घटना घडत असल्याने दिल्लीत चाललंय तरी काय? असा सवाल आता केला जात आहे.
दिल्लीच्या सुल्तानपूर परिसरातील कंझावला परिसरात ही धक्कादायक आणि संपूर्ण देशाला हादरवणारी घटना घडली आहे. ही तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. तिचे श्वास थांबलेले होते. तिच्या संपूर्ण शरीराचं मांस निघालं होतं. या तरुणीवर बलात्कार झाला नसल्याचं पोलीस सांगत आहे. पोलीस लोकांची कसून तपासणी करत असून या घटनेचा तपास करत आहे.
31 डिसेंबरच्या रात्री पहाटे 3 वाजता कंझावला परिसरात एक पीसीआर कॉल आला होता. एका तरुणी नग्नावस्थेत रस्त्याच्या पडलेली असल्याचं फोनवरून सांगण्यात आलं होतं.
त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला. तेव्हा ही 23 वर्षीय तरुणी स्कुटीने घरी जात असल्याचं समजल्याचं डीसीपी हरेंद्र सिंह यांनी सांगितलं.
एका बलेनो कारमधून पाच तरुण चालले होते. त्यांच्या कार आणि स्कुटीची धडक बसून अपघात झाला. त्यानंतर या कारने स्कुटीला चार किलोमीटरपर्यंत फरफटत नेले. या स्कुटीसोबत मुलगीही रस्त्यावरून फरफटत जात होती. रस्ते मोकळे असल्याने कार भरधाव वेगात होती.
इतक्या जोरात फरफटत नेलं जात होतं की या मुलीच्या शरीरावरील कपडेही निघून गेले होते. तिच्या शरीराला प्रचंड जखमा झाल्या होत्या. त्यामुळे अंगातून प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने या तरुणीचा मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.
तरुणीसोबत राक्षसी कृत्य करणारे पाचही तरुण दिल्लीतीलच आहेत. त्यांच्यातील कोणी हेअर ड्रेसर आहेत तर कोणी रेशन डिलर आहेत. पोलिसांनी या पाचही तरुणांना ताब्यात घेतलं आहे. यातील 26 वर्षीय राजेश खन्ना ग्रामिण सेवेत चालक म्हणून काम करतो. तसेच अमित खन्ना हा उत्तम नगरात एसबीआय कार्ड्ससाठी काम करतो.
या मृत तरुणीचे कुटुंबीय अमन विहार येथे राहतात. तिच्या घरी आई, चार बहिणी आणि दोन भाऊ आहेत. तिच्या वडिलांचा आधीच मृत्यू झाला आहे. बहीण विवाहित आहे. भाऊ लहान आहेत. तिचे कुटुंबीय या घटनेने हादरून गेले आहेत. ते बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत. या तरुणीच्या आईने केवळ डीसीपीशी संवाद साधला.
दिल्ली हादरवणाऱ्या या घटनेनंतर दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी दिल्ली पोलिसांना समन्स बजावलं आहे. या घटनेची पूर्ण माहिती देण्याबरोबरच आरोपींवर कोणती कलमं लावण्यात आली याबाबतची माहिती आयोगाने विचारल्याचं सूत्रांनी सांगितलं.