नवी दिल्ली : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात आरोपी आफताब पुनावालाचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं. पण आफताबने श्रद्धाची हत्या केल्यानंतर जवळपास सर्वच पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे पोलिसांसमोर पुरावे शोधण्याचं मोठं आव्हान होतं. अखेर तपासादरम्यान पोलिसांच्या हाती एक सीसीटीव्ही फुटेज लागलंय. या सीसीटीव्हीत आफताब हातात पिशवी घेऊन जात असल्याचं दिसतंय.
आरोपी आफताब हा श्रद्धाच्या शरीराचे तुकडे जंगलात फेकण्यासाठी पहाटेची वेळ निवडायचा, ज्यावेळी रस्त्यावर कुणीच नसेल, त्यावेळेला आफताब पुरावे नष्ट करण्यासाठी घराबाहेर पडायचा.
दिल्लीजवळच्या मेहरोलीच्या जंगलातून काही पुरावे मिळाल्याचा दावा पोलिसांनी केलाय. आफताबच्या घरातील सगळे कपडे पोलिसांनी जप्त केलेय. पण हत्येच्या दिवशी वापरलेले कपडे आफताबने नष्ट केले आहेत.
आफताबने हत्येसाठी वापरलेले शस्त्रही पोलिसांना अद्याप मिळालेले नाहीत. हत्येनंतर सहा महिन्यात आफताबने सर्व पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केलाय.
दिल्लीतल्या फ्लॅटमध्ये बेडरुममध्ये आफताबचे तीन फोटो होते. हत्येनंतर आफताबने या तिन्ही फोटोंची फ्रेम तोडली. त्यातून फोटो बाहेर काढले आणि जाळले. त्याने 23 मे रोजी श्रद्धाचं सामान एका बॅगमध्ये भरलं आणि ते सामान जंगलात फेकून दिलं.
आफताबने श्रद्धाचं शीर एका तलावात फेकल्याची माहिती दिली. त्यामुळे पोलीस आता तो तलावही रिकामा करणार आहेत.
दिल्ली पोलिसांचं एक पथक वसईतही पोहोचलंय. श्रद्धाच्या एका मैत्रिणीची दिल्ली पोलिसांकडून कसून चौकशी केली जातेय.
दिल्लीला शिफ्ट होण्याआधी आफताब आणि श्रद्धा वसईत एका फ्लॅटमध्ये राहत होते. तिथेही पोलीस तपासासाठी गेले.
आफताबने श्रद्धाची थंड डोक्याने हत्या केलीय. एकेक पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे पुरावे शोधणं आणि हत्येसाठी वापरलेलं शस्त्र शोधणं, त्याआधारे आफताबला कठोरात कठोर शिक्षा देणं हे दिल्ली पोलिसांसमोर आव्हान आहे.