भोलेबाबा नावाच्या एका व्यक्तीच्या सत्संगासाठी शेकडो कुटुंबं उघड्यावर पडली. बाबा आला, प्रवचन देवून फरारही झाला. बाबाच्या वाहनाची धूळ माथी लावण्यासाठी उसळलेल्या गर्दीत १२१ जण चेंगरुन मेली. यात असंख्य लहान मुलं, महिला होत्या. मृतदेहांसह लहान मुलांच्या दुधाच्या बॉटल्स, चप्पला, सोबत आणलेल्या साहित्याचा खच पडलाय. पण इतका खटाटोप ज्याच्यासाठी केला होता, तो बाबा
क्षणभरही न थांबता घटनास्थळावरुन पसार झाला. नेमकं घडलं काय ते आधी समजून घेऊयात.
भोलेबाबाचा मंडप सजला होता. 80 एकर शेतजमिनीला संत्सगाच्या नियोजनासाठी तयार करण्यात आलं होतं. जवळपास २ लाखांची इथं गर्दी होती. आतला मंडप पूर्ण गर्दीनं भरलेला. मंडपाबाहेरही लोक उभे होते. मंडपाच्या बाजूला पावसाचं पाणी साचल्यानं घसरुन पडण्याचा धोका होता. या प्रवेशद्वारासमोरच हायवे आहे. बाबाच्या दर्शनासाठी त्या हायवेच्या अलीकडे आणि पलीकडेही गर्दी होती. भोलेबाबाची एन्ट्री या बाजूनं झाली. बाबानं प्रवचन दिलं आणि त्यानंतर बाबा रवाना व्हायला निघाला. बाबाच्या गाडीची धूळ अंगाला लागावी म्हणून मंडपातले लोक हायवेच्या दिशेनं धावले. पण हायवेवर आधीच तुफान गर्दी. त्यात मंडपातून गाडीमागे धावलेली गर्दीनं दाटीवादी आणि धक्काबुक्की झाली.
आपण गुदमरु शकतो या भीतीनं महिला आणि काही पुरुष बाहेर पडण्यासाठी या दिशेला शेतीच्या बाजूनं धावले. पण आधीच ओलसर जमिनीमुळे अनेकांचे पाय घसरले. साडया आणि लहान मुलंही सोबत असल्यामुळे अनेक महिलांना उठायला वेळ लागला. पण तोपर्यंत मागून येणारी गर्दी अंगावर आली आणि होत्याचं नव्हतं झालं.
भगव्या वस्राऐवजी हा बाबा थ्री-पीस वा शर्ट-पँटच्या पेहरावात प्रवचन देतो. अलिशान सिंहासन आणि बाजूला पत्नी असते. पश्चिम उत्तर प्रदेशात बाबाचे मोठे भक्त आहेत. एससी, एसटी, ओबीसी आणि मुस्लिम वर्गही बाबाचा अनुयायी आहे. बाबाचं मूळ नाव सुरज पाल. निरुपणकार बनल्यानंतर त्यानं आपलं नाव नारायण साकार हरी केलं. लोक त्याला भोलेबाबा नावानं बोलावतात.
आधी 18 वर्ष यूपी पोलिसात नोकरी केली. स्वेच्छानिवृत्ती घेवून गावोगावी अध्यात्माचा प्रचार केला आणि अचानक बाबा निरुपणकारही बनला. आपला कुणीही गुरु नाही. फक्त ईश्वरावर श्रद्धा आहे, त्याची अनुभुतीही झालीय म्हणून स्वतः बाबा सांगतो कोरोनाकाळात ५० लोकांची परवानगी असताना बाबानं ५० हजारांची गर्दी जमवल्यानं वादातही आला होता.
मीडियापासून लांब राहणं बाबा पसंत करतो. त्याची स्वतःची 10 हजार लोकांची एकप्रकारे आर्मी आहे. ज्यांना सेवेदार म्हटलं जातं. काळा, पांढऱ्या आणि गुलाबी रंगाच्या गणवेशात बाबाची आर्मी काम करते. सत्संग नियोजनात पोलिसांनाही ते हस्तक्षेप करु देत नाहीत. काळा रंगाच्या युनिफॉर्मवाले बाबाचे सेवेदार मंडपाच्या बाहेरची, पांढऱ्या रंगवाले मंडपातील आतली व्यवस्था पाहतात. तर गुलाबी युनिफॉर्मात महिला सेवेकरी असतात. हे सेवेदार कुणालाही सत्संग चित्रीत करु देत नाहीत.
दुर्घटनेआधी एक व्यक्ती गर्दीचा व्हिडीओ शूट करत असताना बाबाच्या सेवेकरानं त्याला हटकलं होतं. भोलेबाबाचा एक व्हिडीओही सध्या व्हायरल होतोय. ज्यात तो ग्राफिक्सच्या मदतीनं स्वतःच्या हातात सुदर्शन चक्र आणि वीजेचा कडकडाट होताना दाखवतोय. लोकांसाठी गोवर्धन पर्वत उचलणारे श्रीकृष्ण कुठे आणि १२१ लोक चिरडून मेल्यानंतर पळून जाणारा हा बाबा कुठे.
दुर्घटनेनंतर घटनास्थळावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पोहोचले. आयोजकांवर गुन्हे दाखल झाले. पण फरार झालेल्या बाबाचा एफआयरमध्ये साधा उल्लेख देखील नाही. सत्ताधारी असोत की विरोधक मतांच्या राजकारणासाठी गर्दीत चेंगरुन मेलेल्यांपेक्षा ती गर्दी जमवणारे राजकारण्यांना हवेहवेसे असतात.
उत्तर प्रदेश सरकारनं किमान आयोजकांवर गुन्हे तरी दाखल केलेत. पण ज्या महाराष्ट्र भूषण सन्मान कार्यक्रमात खुद्द सरकारच आयोजक होतं., तिथं उष्माघातानं बळी गेलेल्यांबद्दल कुणावर कारवाई झाली., यावर फडणवीसांनी आपल्या एसआयटींच्या मालिकेत अजून एक एसआयटीचं पुष्प गुंफण्यास काय हरकत आहे?…मात्र विरोधाभास म्हणजे आज महाराष्ट्र सरकारनं यूपीच्या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केलाय.
दुसरीकडे भूत-भविष्य-वर्तमान जाणणारा बाबा बागेश्वर या घटनेपासून सावध होवून समर्थकांना आवाहन करतोय. ज्याला विश्वाच्या चराचराची माहिती आहे., ज्याला भूकंप-त्सुनामी, रेल्वे दुर्घटनांची आधीच आकाशवाणी होते. त्याच बागेश्वर बाबाच्या मुंबईतल्या सत्संगात भक्तांचे मोबाईल-मंगळसूत्र चोरी होतात, हा दुसरा विरोधाभास.
श्रद्धेत काहीही गैर नाही. पण अशा बाबांच्या पायाच्या धुळीसाठी लहान मुलांसकट स्वतःचे जीव धोक्यात घालणारे अनुयायी असतील., तोपर्यंत अशा बाबांचं पिक येतच राहणार.