नवी दिल्ली : मॉडेल दिव्या पाहुजाचा मृतदेह हरियाणातील एका कालव्यात सापडला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिव्याचा मृतदेह टोहना येथील कालव्यात आढळून आला. मृतदेह दिव्याचाच असल्याची ओळख दिव्याच्या कुटुंबीयांनी केली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. पोलिसांनी आरोपी बलराजने दिलेल्या माहितीवरुन मृतदेह शोधण्यास सुरुवात केली. यासाठी पोलिसांची सहा पथके काम करत होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिव्याचा मृतदेह पंजाबमधील एका कालव्यात फेकण्यात आला होता. मृतदेह वाहून हरियाणातील कालव्यात पोहोचला. मृतदेहाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पंजाब ते हरियाणा या मार्गावर तपास केला, त्यानंतरच टोहना कालव्यात मृतदेह सापडला. काही दिवसांपूर्वीच दिव्या पाहुजा हत्याकांडात नवा खुलासा झाला होता. आरोपी बलराजला अटक केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
मॉडेल दिव्या पाहुजाचा मृतदेह पटियाला कालव्यात फेकण्यात आला होता. मुख्य आरोपी अभिजीतचा जवळचा बलराज गिल याला पोलिसांनी पश्चिम बंगालच्या विमानतळावरून अटक केली.
बलराज गिलने पोलिसांना सांगितले होते की, दिव्या पाहुजा हिचा मृतदेह त्याने कालव्यात फेकून दिला होता. ३ जानेवारीला त्याने दिव्याचा मृतदेह कालव्यात फेकल्याची कबुली पोलिसांना दिली. या खुलाशानंतर गुन्हे शाखेने पटियाला येथून जाणाऱ्या कालव्यात शोधमोहीम सुरू केली आहे.
मॉडेल दिव्या पाहुजा हत्याकांडातील आरोपी बलराज गिल याला पश्चिम बंगालमधील गुन्हे शाखेने गुरुवारी अटक केली. बलराज गिल हा तोच व्यक्ती आहे ज्याने दिव्या पाहुजाच्या मृतदेहाची बीएमडब्ल्यू कारमध्ये विल्हेवाट लावण्यासाठी रवी बंगा सोबत नेले होते आणि तो फरार झाला होता. मोहाली येथील रहिवासी असलेल्या बलराज गिलला घटनेच्या 10 दिवसांनंतर अटक करण्यात आली.
या घटनेची सध्या देशभरात चर्चा आहे. 2 जानेवारीला दिव्याची गुरुग्राममधील सिटी पॉइंट हॉटेलच्या रूम नंबर 111 मध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. हॉटेल मालक अभिजीत सिंग याने ही हत्या केल्याची माहिती आहे.
बलराज देश सोडून बँकॉकला पळून जाण्याच्या तयारीत होता. पण पोलिसांनी कोलकाता विमानतळावरून त्यांना अटक केली. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी अभिजीतने त्याला 10 लाख रुपयेही दिले होते.