कुत्रा हा माणसाचा मित्रं असल्याचं आपण अनेकदा ऐकलंय, वाचलंय. मोठमोठ्या गुन्ह्यांचा तपास लावण्यासाठी विविध जातीच्या कुत्र्यांचा पोलीस नेहमी आधार घेतात. आरडीएक्ससारखी स्फोटकं जी सहज पोलीसांना सापडत नाहीत ते निव्वळ वासावर कुत्रे शोधून देतात. त्यांच्या ह्या कर्तृत्वाचे अनेक किस्से वाचलेले आहेत. पण आज अशी एक घटना समोर आलीय, ज्यातून माणसांपेक्षा माकडांना एखादा गुन्हा घडल्याचं लवकर कळतं का असा प्रश्न निर्माण होईल. ही घटना घडलीय उत्तर प्रदेशातल्या कानपूरमध्ये आणि ह्या घटनेमुळे दोन माकडं चर्चेत आलेत.
नेमकं काय घडलंय?
सीसामऊ पोलीस ठाण्याच्या अंतर्गत ही घटना घडलीय. एक कोरडी विहिर होती आणि त्यावर दोन माकडं प्रचंड दंगा करत होती. जोर जोरानं ओरडत होती. आजूबाजुला माणसं आली की आणखीनच किंचाळायची. लोकांनी नेहमीप्रमाणं त्याकडे दूर्लक्ष केलं. पण माकडं किंचाळायची काही थांबत नव्हती. शेवटी लोकांनी जाऊन विहिरीत डोकावून बघितलं तर एका महिलेचा मृतदेह त्यांना पडल्याचा आढळला. त्यांनी पोलीसांना फोन केला. दिनेशसिंह नावाच्या प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं की,- दोन माकडं होती. ते अधूनमधून यायची आणि त्या कोरड्या विहिरीत बघायची. किंचाळायची. मग मी जवळ जाऊन बघितलं. तर विहिर खोल होती. त्यात अंधार होता. मग टॉर्च मागवला. आत उजेड टाकून बघितला तर एका महिलेचा मृतदेह तिथं दिसत होता. मग आम्ही पोलीसांना कळवलं. हे सगळं त्या दोन माकडांमुळे उघड झालं.
सहा तास लागले मृतदेह काढायला
माकडांनी जी तत्परता दाखवली ती माणसांना मात्र दाखवता आली नाही. सरकारी काम किती ढिसाळ चालतं याचा हा नमुना. माकडांमुळे मृतदेह उघडा पडला पण पोलीस आणि यंत्रणेला तो विहिरीतून बाहेर काढायला सहा तास लागले. आधी पालिकेची टीम आली, तिनं पहाणी केली, पण मृतदेह काही बाहेर काढला नाही. नंतर फायरब्रिगेड आलं. त्यांनीही प्रयत्न केले. पोलीस इतर विभागांनाही कामाला लावत होते. नंतर जलविभागाची टीम आली त्यांनी मृतदेह बाहेर काढला. तोपर्यंत सहा तास उलटून गेले.
हत्या की आत्महत्या?
पोलीसांनी तपास हाती घेतला. त्यात राधाबाई कश्यप नावाच्या महिलेचा हा मृतदेह असल्याचं उघड झालं. त्या शौचासाठी म्हणून बाहेर पडल्या होत्या आणि पण त्यानंतर त्या दिसल्याच नाहीत. शेवटी त्यांचा मृतदेह त्या कोरड्या विहिरीत सापडला. आर्थिक तंगीतून राधाबाई कश्यप यांनी आत्महत्या केल्याचं सांगितलं जातंय. पोलीसांना मृतदेह काढायला सहा तास लागले त्यावर पोलीस म्हणतात-दुपारी दोन वाजता पोलीसांना माहिती मिळाली होती. त्यानंतर आम्ही घटनास्थळावर धाव घेतली. महिलेचे कुटुंबिय शोधले. त्यांच्याशी बातचीत केली. त्यांच्या कुटुंबात पती आणि मुलं आहेत. घरात आर्थिक तंगी चालू होती. मुलांना एका कोचिंग इन्स्टिट्युटमध्ये टाकायचं होतं, तेही जमत नव्हतं. त्यातूनच राधाबाईंनी स्वत:ला संपवलं असावं. कुटुंबानं त्यांचा शोध घेतला. मंदीर आणि इतर ठिकाणीही बघितलं पण त्या काही सापडल्या नाहीत. ह्या सगळ्या प्रक्रियेला वेळ गेला.
Video | लग्न थाटामाटात, पण सासरला जाताना खवळली, नवरीने लगावली नवरदेवाच्या कानशिलात, व्हिडीओ व्हायरल