‘क्राईम पेट्रोल’, ‘दृश्यम’चा इफेक्ट, खेळताना पुन्हा पुन्हा ‘राज्य’ आल्यानं मित्राला गाडलं; 13 वर्षीय मुलाला अटक

| Updated on: Feb 03, 2021 | 6:21 PM

'दृश्यम' हा हिंदी सिनेमा आणि 'क्राईम पेट्रोल' ही मालिका पाहून मित्रानेच मित्राची हत्या केली. ('Drishyam' style murder in pune, boy kill his friend and hide body)

क्राईम पेट्रोल, दृश्यमचा इफेक्ट, खेळताना पुन्हा पुन्हा राज्य आल्यानं मित्राला गाडलं; 13 वर्षीय मुलाला अटक
Husband Attack On Gym Owner
Follow us on

पुणे: ‘दृश्यम’ हा हिंदी सिनेमा आणि ‘क्राईम पेट्रोल’ ही मालिका पाहून मित्रानेच मित्राची हत्या केली. केवळ हत्या करून तो थांबला नाही तर मित्राला त्याच्याच घराच्या जवळ गाडल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. (‘Drishyam’ style murder in pune, boy kill his friend and hide body)

पुण्यातील कोथरूडमधील केळेवाडी परिसरात ही घटना घडली आहे. केळेवाडी परिसरात राहणारा 11 वर्षीय विश्वजित विनोद वंजारी हा सकाळी घराबाहेर पडला होता. पण तो घरीच न आल्याने 29 जानेवारी रोजी त्याच्या पालकांनी पोलिसात तक्रार नोंदवली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता त्याच्याच घराजवळ अर्धवट गाडलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. दगडाने डोकं ठेचून त्याचा खून केल्याचं प्रथम दर्शनी समोर आलं. त्यामुळे सर्वचजण घाबरले. अचानक झालेल्या या प्रकारावर अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. पोलिसांनीही तात्काळ परिसरातील सीसीटीव्ही तपासले. त्यात एका ठिकाणी विश्वजित सोबत त्याचा १३ वर्षाचा मित्र आढळून आला. त्यामुळे पोलिसांनी त्याची कसून चौकशी सुरू केली. त्याची चौकशी करत असताना अनेक धक्कादायक बाबी समोर आल्याने पोलिसही चक्रावून गेले.

कारण ऐकलं अन् पोलीसही चक्रावले

चौकशी सुरू असताना विश्वजीतच्या मित्राने सांगितलेलं कारण अत्यंत धक्कादायक होतं. आम्ही खेळत असताना विश्वजीत माझ्यावर सारखं राज्य आणायचा. सतत पराभूत होत असल्याने मला अपमानास्पद वाटायचं. त्याचा राग यायचा. त्या दिवशी माझ्या रागाचा पारा चढला. त्यामुळे मी विश्वजीतला धक्का दिला. त्यात तो जखमी झाला, असं या मुलाने सांगितलं. या घटनेने मी घाबरून गेलो होतो. त्यानंतर मी विश्वजीतच्या डोक्यात दगड टाकला आणि जवळच असलेल्या दगडांनी त्याला ठेचून मारलं.

मालिका, सिनेमाचा परिणाम

या मुलाने क्राईम पेट्रोल ही मालिका, दृश्यम चित्रपट आणि युट्युबवर वेगवेगळे व्हिडीओ बघून हे कृत्य केलं आहे. या सिनेमा, मालिका पाहूनच असं करण्याचं आपल्याला सूचल्याचं त्याने सांगितलं, असं कोथरुड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब बडे यांनी सांगितलं. याप्रकरणी या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आलं असून त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे, अशी माहितीही बडे यांनी दिली.

मानसोपचार तज्ज्ञ काय म्हणतात?

स्क्रीनचा वाढलेला अधिकचा वापर, लहान मुलांमध्ये मोबाईलची वाढलेली क्रेझ आणि विभक्त कुटुंबासोबत मुलांवरील पालकांचा होत असलेलं दुर्लक्ष… आदी गोष्टी अशा प्रकारांना जबाबदार असल्याचं मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अजय दुधाने यांनी सांगितलं. (‘Drishyam’ style murder in pune, boy kill his friend and hide body)

 

संबंधित बातम्या:

आत्महत्या केलेल्या मुलीला पुरुन बेपत्ता असल्याचा कांगावा, आई-वडिलांचा बनाव दहा वर्षांनी उघड

मैदानातील वादातून आधी मित्राला ढकललं, नंतर जमिनीत गाडलं, पुण्यात 13 वर्षीय तरुण ताब्यात

अवघ्या 400 रुपयांसाठी दोन मित्रांमध्ये हाणामारी, एकाचा मृत्यू, थरार सीसीटीव्हीत कैद

(‘Drishyam’ style murder in pune, boy kill his friend and hide body)