परभणी : समोसा आणि बालुशाहीवरुन झालेल्या वादातून दोन तरुणांनी हातगाडा चालकावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना परभणीत घडली. या हल्ल्यात हातगाडा चालक जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी सोनपेठ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गंगाधर डुकरे असे हल्ला करण्यात आलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी सोनपेठ पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध कलम 324, 504, 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिद्धेश्वर पानखेडे आणि ऋषिकेश मोरे अशी हल्ला करणाऱ्या आरोपींची नावे आहेत.
गंगाधर डुकरे हे व्यापारी सोनपेठ आठवडी बाजारात गाड्यावर खिचडी, समोसे वगैरे विकतात. नेहमीप्रमाणे डुकरे यांनी सोनपेठ बाजारात हातगाडा लावला होता. यावेळी सिद्धेश्वर पानखेडे आणि ऋषिकेश मोरे हे बाजारात आले होते.
यावेळी सिद्धेश्वर आणि ऋषिकेश हे डुकरे यांच्या गाड्यावर समोसा खाण्यासाठी गेले होते. त्यांनी समोसा चविष्ट नसल्याचे सांगत परत दिला आणि बालुशाही घेतली. मात्र त्यानंतरही ते पदार्थांना चल नसल्याचे सांगत डुकरे यांच्याशी वाद घालू लागले.
यानंतर या दोघांनी डुकरे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद इतका वाढला की, आरोपींनी खिशातून चाकू काढत डुकरे यांच्यावर जीवे मारण्याच्या उद्देशाने वार केले.
या हल्ल्यात जखमी झालेले डुकरे यांनी सोनपेठ पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी त्यांना उपचार करण्यासाठी सोनपेठ येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी आंबेजोगाई येथे हलवण्यात आले.
दरम्यान, मात्र जीवे मारण्याच्या उद्देशाने चाकूचे हल्ला केले असताना 307 कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याने शहरातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष घालून 307 कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी, मागणी सोनपेठ येथील व्यापाऱ्यांकडून केली जात आहे.