नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड केसमध्ये ED ने मोठी कारवाई केली आहे. ईडीने एसोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (AJL) आणि यंग इंडियाची 751.9 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. गुन्हयामधून कमावलेल्या पैशातून ही संपत्ती खरेदी केल्याचा आरोप आहे. ईडीने पीएमसएलए अंतर्गत जप्तीची ही कारवाई केली आहे. दिल्ली, लखनऊ आणि मुंबईमध्ये जप्तीची ही कारवाई करण्यात आलीय. ED च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 661.69 कोटी रुपयांची संपत्ती AJL आणि 90.21 कोटीची संपत्ती यंग इंडियाची आहे. ईडीने 2014 साली दिल्लीच्या मेट्रोपॉलिटन मजिस्ट्रेटच्या आदेशानुसार AJL आणि यंग इंडिया विरुद्ध तपास सुरु केला होता.
या प्रकरणातील आरोपींनी मेसर्स यंग इंडियाच्या माध्यमातून AJL ची कोट्यवधी रुपयांची संपत्ती मिळवण्यासाठी गुन्हेगारी कट रचला होता. ईडीच्या तपासातून ही माहिती समोर आलीय. मेसर्स एजेएलला वर्तमानपत्र प्रकाशित करण्यासाठी सरकारडून भारताच्या विभिन्न शहरात सवलतीच्या दरात जमिनी दिल्या गेल्या होत्या. एजेएलने 2008 साली आपलं प्रकाशन कार्य बंद केलं. व्यावसायिक उद्देशासाठी संपत्तीचा वापर सुरु केला. एजेएलच 90.21 कोटी रुपयांच कर्ज अखिल भारतीय काँग्रेस कमिटीला चुकवायच होतं. काँग्रेस पक्षाने 90.21 कोटी रुपयांच हे कर्ज माफ केलं त्यानंतर कारस्थान रचून AJL ला मेसर्स यंग इंडियाला अवघ्या 50 लाख रुपयात विकलं.
गांधी कुटुंबावर आरोप काय?
यानंतर यंग इंडियाचे शेअर गांधी कुटुंब आणि त्यांच्या जवळच्या माणसांना देण्यात आले. म्हणजे AJL ची कोट्यवधींची संपत्ती यंग इंडियाच्या माध्यमातून गांधी कुटुंबाच्या ताब्यात आली. त्याआधी AJL ने एक एक्स्ट्राऑर्डिनरी जनरल मीटिंग बोलावली. एका रेसोल्युशन पास केलं. यंग इंडियाने एजेएलच्या संपत्तीवर ताबा मिळवला. या प्रकरणात सोनिया गांधी, राहुल गांधी, ऑस्कर फर्नांडिस, मोती लाल वोहरा आणि सुमन दुबे आरोपी आहेत. ED ने या प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधीची चौकशी सुद्धा केली आहे.
‘ही कंपनी काँग्रेसचा वारसा सांगते’
“विधानसभा निवडणुकीत पराभव डोळ्यासमोर दिसत आहे. त्यावरुन लक्ष हटवण्याची भाजपाची हताशा यामधून दिसते” असं काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी म्हणाले. नॅशनल हेराल्ड हा भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचा आवाज होता. ही कंपनी काँग्रेसचा वारसा सांगते, म्हणून हे सर्व सुरु आहे. बदल्याच्या भावनेच्या या रणनितीला काँग्रेस अजिबात घाबरणार नाही असं काँग्रेसने म्हटलय.