नाशिक : ऑगस्ट महिन्यात इगतपुरी तालुक्यातील घोटी परिसरात एका व्यक्तीचा कारमध्ये जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ ( Nashik Crime ) उडाली होती. त्याचे कारण म्हणजे काही महिन्यांपूर्वी आशिकच्या विल्होळी परिसरात एका महिला डॉक्टरचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर तिचा तिच्याच पतीने खून गेल्याची बाब उघडकीस आली होती. त्यामुळे पुन्हा नाशिक जिल्ह्यात जळालेल्या अवस्थेत मृतदेह ( Murder News ) आढळून आल्याने उलटसुलट चर्चा होती. त्यानंतर पोलिसांनी तपास केल्यानंतर हत्या झाल्याची बाब निष्पन्न झाल्यावर घोटी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, ही व्यक्ती कोण ? हत्या का केली ? असे विविध प्रकारच्या तपासाचे पोलिसांसमोर आव्हान होते.
घोटी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केल्यानंतर हत्या झालेल्या व्यक्तीचा शोध घेतला. त्यामध्ये माजी सैनिक असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर हत्या करणाऱ्या दोन व्यक्तींमध्ये एक अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे.
चांदवड तालुक्यातील न्हनावे येथील माजी सैनिक संदीप पुंजाराम गुंजाळ यांची हत्या झाली होती. समृद्धी महामार्गाचे सुरक्षा रक्षक म्हणून ते काम करत होते. त्यानंतर ते त्यांच्या कारमधून घरी जात असतांना त्यांची हत्या करण्यात आली होती.
हत्या झाल्यानंतर संदीप गुंजाळ यांचा मृतदेह त्यांच्याच कारच्या पुढील सीटवर बांधून आंबेवाडी येथील निर्जन स्थळी घेऊन जात गाडीतील डिझेल काढून त्यांच्या अंगावर टाकून पेटवून देण्यात आल्याची कबुली दोन्ही आरोपीने दिली आहे.
इगतपुरी येथील नांदगाव सदो येथील आकाश चंद्रकांत भोईर आणि एका अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पोलिसांनी तपास करत असतांना त्यांनी खुनाही कबुली दिली असून खून करण्यामागील धक्कादायक कारण यानिमित्ताने समोर आले आहे.
संदीप गुंजाळ हे घरी जात असतांना त्यांच्या कारचा दुचाकीवर असलेल्या आकाश भोईर आणि त्याचा अल्पवयीन सोबतीला कारचा कट लागला होता. त्याचा राग आल्यानंतर दोघांमध्ये शिवीगाळ झाली आणि त्यानंतर त्या दोघांनी चाकूने वार केले होते. त्यानंतर त्यांनी निर्जनस्थळी घेऊन जात पेटवून दिले होते.