नवी दिल्ली : फेसबुक लाईव्ह करुन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे प्राण वाचवण्यात दिल्ली पोलिसांना यश आलं आहे. हाताच्या नसा कापून घेताना 39 वर्षीय तरुणाने फेसबुकवर लाईव्ह स्ट्रीमिंग केले होते. अमेरिकेतील फेसबुकच्या अधिकाऱ्यांनी हे पाहून अलर्ट केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तरुणाला वाचवले. शेजाऱ्यांशी झालेल्या वादानंतर तरुणाने टोकाचे पाऊल उचलले होते. (Facebook alerts Delhi Police about man’s self-harm video Police saved from attempt to Suicide)
सेल्फ हार्म व्हिडीओ
सोहन लाल (नाव बदलले आहे) नावाच्या 39 वर्षीय व्यक्तीने गुरुवारी रात्री आत्महत्येचा प्रयत्न केला. पश्चिम दिल्लीतील द्वारका भागात राहणाऱ्या सोहनने हातावर अनेक वेळा वार केले. यावेळी त्याने फेसबुकवर लाईव्ह स्ट्रीमिंग केले होते. गुरुवारी रात्री 12 वाजून 50 मिनिटांनी हा प्रकार सुरु होता. त्यावेळी सायबर विभागाचे डीसीपी अन्येश रॉय यांना फेसबुकच्या अमेरिकेतील ऑफिसमधून फोन आला. सेल्फ हार्म व्हिडीओविषयी माहिती देण्यात आली.
पोलिसांची तातडीची पावलं
पोलिसांनी संबंधित फेसबुक अकाऊण्ट तातडीने चेक केले. त्याच्याशी लिंक मोबाईल नंबरवर संपर्क साधला असता तो स्विच्ड ऑफ येत होता. मोबाईल नंबरशी निगडित पत्ता पोलिसांनी शोधला असता, तो द्वारका भागातील असल्याचं समजलं. त्या भागातील पोलीस उपनिरीक्षक अमित कुमार यांनी तातडीची पावलं उचलत घटनास्थळी धाव घेतली. यावेळी सोहन रक्तबंबाळ अवस्थेत जिन्यात पडलेला आढळला. पोलिसांनी आधी त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्याची रवानगी एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये करण्यात आली. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
शेजाऱ्यांशी भांडणानंतर टोकाचे पाऊल
सोहन लाल हा द्वारका भागातील मिठाईच्या दुकानात काम करतो. 2016 मध्ये पत्नीच्या निधनानंतर तो मानसिकदृष्ट्या अस्थिर झाला आहे. त्याची दोन लहान मुलंही आहेत. गुरुवारी शेजाऱ्यांसोबत भांडण झाल्यामुळे संतापाच्या भरात त्याने टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्याने फेसबुक लाईव्ह केल्यामुळे अमेरिकेतील कार्यालयाला माहिती मिळाली आणि पोलिसांच्या मदतीने त्याचा जीव वाचवण्यात यश आले.
धुळ्यातील तरुणाचे प्राणही वाचवले
याआधी, फेसबुकवर लाईव्ह येऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या धुळ्यातील युवकाचे प्राणही आयर्लंडचे फेसबुक अधिकारी आणि महाराष्ट्र पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे वाचले होते. यामध्ये मुंबई पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
संबंधित बातम्या :
पत्नीच्या मृत्यूनंतर पतीचीही रेल्वेखाली आत्महत्या, फेसबुक लाईव्ह करत जगाचा निरोप
फेसबुक लाईव्हमध्ये आत्महत्येचा प्रयत्न, आयर्लंडमधून सूचना, करंदीकरांच्या प्रयत्नांनी युवक बचावला
(Facebook alerts Delhi Police about man’s self-harm video Police saved from attempt to Suicide)