जयपूर : स्वत:ला आयपीएस सांगून लोकांना लुबाडणाऱ्या एका भामट्याला राजस्थानच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे संबंधित आरोपी हा चार वर्षांपासून आयपीएस अधिकाऱ्यासारखे कपडे परिधान करुन अनेकांना लुबाडत असल्याचं उघड झालं आहे. आरोपीचा पेहराव बघितल्यानंतर पहिल्यांदा पोलीसही चक्रावले. कारण त्याचा रुबाब बघून तो हुबेहुब आयपीएस अधिकारी सारखा भासत होता. मात्र, त्याची चौकशी केली असता त्याचं शिक्षण फक्त दहावीपर्यंत झाल्याचं उघड झालं. याशिवाय 2015 मध्ये तो कॉन्स्टेबलची परीक्षा नापास झाल्यानंतर त्याने खोटा आयपीएस बनून लोकांना लुबाडण्याचं काम सुरु केल्याचं समोर आलं आहे (fake IPS arrested by Rajasthan Pali Police).
चार वर्षांपासून लुबाडणं सुरु
संबंधित आरोपीचं नाव फुसाराम असं आहे. त्याने त्याच्या बनावट आयकार्डवर स्वत:चं नाव राजवीर शर्मा पुत्र रामप्रसाद शर्मा असं लिहिलं होतं. तो पाली जिल्ह्यातील सर्वोदय नगर येथे वास्तव्यास आहे. तो गेल्या चार वर्षांपासून पाली जिल्ह्यातील अनेकांना आयपीएस सांगत लुबाडत होता. यावेळी देखील त्याने एका ट्रॅव्हल्सच्या एजंटला फसवण्याचा प्रयत्न केला. आरोपी पाली येथून मुंबईला येणार होता. मात्र, त्याला तिकीट काढायचं नव्हतं. आयपीएस अधिकारी म्हणत फुकटात तिकीट बळकावण्याचा त्याने प्रयत्न केला. त्यामुळे त्या दोघांमध्ये बाचाबाची झाली.
पोलिसांनी कसं पकडलं?
ट्रव्हल्स एजंटने याबाबत स्थानिक पोलिसांना घटनास्थळी बोलावलं. पोलिसांनी सुरुवातीला आरोपीला बघितलं तेव्हा ते देखील संभ्रमात पडले. आरोपी फुसाराम वर्दीत हुबेहुब आयपीएस वाटत होता. त्याच्या खांद्यावर आयपीएसचं बॅच, स्टार बॅच, अशोक स्तंभ, हातातील गन, वॉकीटॉकी पाहून त्यांना धक्काच बसला. पण त्याची चौकशी केली असता तो लबाड असल्याचं उघड झालं. पोलीस त्याला पोलीस ठाण्यात घेऊन गेले. त्याची चौकशी केली असता त्याने तातडीने आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी त्याच्याजवळीस सर्व साहित्य जप्त केलं.
आरोपीला ‘त्यावेळी’ पोलिसांनी सोडलेलं
आरोपी फुसाराम गेल्या चार वर्षांपासून पाली जिल्ह्यात खोटा आयपीएस बनून लोकांना त्रास देत आहे. त्याने चार वर्षांपूर्वी एका तरुणीला आयपीएस म्हणत धमकवण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी तरुणीने पोलिसात धाव घेतली होती. मात्र, त्यावेळी त्याने वर्दी घातली नव्हती. त्यामुळे पोलिसांनी त्याला दम देवून सोडलं होतं (fake IPS arrested by Rajasthan Pali Police).
आरोपीकडून हुंडा मागण्यावर पत्नीचा छळ
पोलिसांनी आरोपीची माहिती काढली असता अनेक खुलासे झाले. आरोपीचे वडील रामचंद्र हे होमगार्डमध्ये सर्व्हिस करायचे. त्यामुळे ते परिवारासह पाली येथे वास्तव्यासाठी आले होते. आरोपी फुसाराम आपल्या पत्नीला हुंड्यासाठी सारखा त्रास द्यायचा. त्याच्या त्रासाला वैतागून त्याची पत्नी त्याला सोडून गेली. याप्रकरणी पोलिसातही तक्रार दाखल करण्यात आली होती, अशी माहिती आता पोलीस तपासात समोर आली आहे.
हेही वाचा : बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आधी बस रोखली, मुलगा-मुलीला खाली उतरवलं, नंतर प्रचंड मारलं, कारण नेमकं काय?