मुरादाबाद : उत्तर प्रदेशातील पीतल नगरीतील मुरादाबाद येथे एका फॅशन डिझायनरने आत्महत्या केली आहे. तिचा मृतदेह घरातच पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर या फॅशन डिझायनरचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. मुरादाबाद येथील सिव्हिल लाइन्स पोलीस ठाणे परिसरातील नवीन नगरमध्ये ही घटना घडली. मुस्कान नारंग असं या फॅशन डिझायनरचं नाव आहे. ती नवीन नगरमध्ये राहते.
मुस्कान ही मुंबईत काम करत होती. तिने गळफास घेऊन जीवन संपवण्याच्या आधी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. प्रॉब्लेम शेअर केल्याने सर्व काही व्यवस्थित होतं असं लोक म्हणतात. पण मला असं वाटत नाही. मी माझे प्रॉब्ले बहीण, आई वडील आणि मित्रांना सांगितला. पण लोकांनी मलाच समजावण्याचा प्रयत्न केला. मला सेल्फ कॉन्फिडन्स नाहीये असं लोक म्हणतात, असं मुस्कान या व्हिडीओमध्ये म्हणताना दिसते. हा व्हिडीओ तिने शुक्रवारी दुपारी आपल्या कारमध्ये बसून तिने हा व्हिडिओ तयार केला होता, असं सांगितलं जातं.
संध्याकाळी तिने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला. त्यानंतर तिने जीवन संपवलं. संध्याकाळी तिने सर्वांसोबत जेवण केलं. त्यानंतर आपल्या रुममध्ये गेली. ती परत आलीच नाही. तिच्या रुममधून कोणतीच हालचाल जाणवत नसल्याने तिच्या कुटुंबीयांना संशय आला. त्यामुळे त्यांनी दरवाजा उघडून पाहिला तर मुस्कानचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला गेला. फॅशन डिझायनर मुस्कानचा व्हिडीओ पाहून ती टेन्शनमध्ये असल्याचं जाणवतं. मात्र, तिला काय टेन्शन होतं? याची कोणतीच माहिती समोर आलेली नाहीये. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
मुस्कानचे आईवडील, नातेवाईक आणि मित्रांचीही चौकशी केली जात आहे. होळीच्या पूर्वी मुस्कानच्या आयुष्यात सर्व काही व्यवस्थित सुरू होतं. होळीनंतर ती मुंबईला गेली होती. मात्र, मुंबईहून परतल्यावर ती अधिक टेन्शमध्ये होती, असं तिच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे. जीवन संपवण्यापूर्वी तिने केलेल्या व्हिडीओतून तिला काही सांगायचं असल्याचं जाणवतं. मी जे काही करत आहे, ते माझ्या मर्जीने करत आहे. त्यामुळे त्याचा कुणावर आरोप ठेवू नये, असं ती या व्हिडीओत म्हणताना दिसतेय. हा तिचा शेवटचा व्हिडीओ होता.