ठाणे : 50 रुपये चोरल्याच्या रागातून बापानेच दहा वर्षांच्या चिमुकल्याला आपटून मारल्याची धक्कादायक घटना कळव्यामधून समोर आली आहे. कळव्याच्या वाघोबानगरातील हा प्रकार आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपी वडिलांना अटक केली आहे. संदीप उर्फ बबलू प्रजापती असे या आरोपीचे नाव आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून, घटनेचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी संदीप ऊर्फ बबलू प्रजापती हा आपली दोन मुले आणि बायकोसोबत कळवा वाघोबानगर येथील ठाकूरपाडा झोपडप्टटीमध्ये राहातो. 29 डिसेंबर रोजी दुपारी त्याचा दहा वर्षीय मुलाने घरातून 50 रुपये चोरले होते. या गोष्टीचा राग आल्याने आरोपीने मुलाला बेदम मारहण केली, या मारहाणीत मुलगा बेशुद्ध पडला त्याचे हातपाय फ्रॅक्चर झाले. तसेच त्याच्या डोक्याची कवटी देखील फुटली. त्यानंतर संदीपने त्या मुलाला तसेच चादरीत गुंडाळून ठेवले व घराची कडी लावून तो बाहेर पडला.
दरम्यान या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांनी पोलिसांनी दिली. मुलाला बेदम मारहाण करून, घरात बारा तासांपेक्षा अधिक काळ कोंडून ठेवल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दरवाजा उघडला. समोरचे दृष्य पाहून पोलीसही हादरून गेले. त्यांना एका चादरीत गुंडालेला बेशुद्ध अवस्थेतील मुलगा आढळून आला. पोलिसांनी तातडीने या मुलाला ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत बराच उशीर झाल्याने डॉक्टरांनी मुलाला तपासून मृत घोषित केले या प्रकरणी आरोपी वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
अल्पवयीन मुलीचा सौदा; दोन महिलांना अटक; पोलिसांनी ‘अशी’ केली मुलीची सुटका