Crime News: एखादी सावत्र आई एखाद्या मुलीसंदर्भात काय करु शकते? त्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पाच वर्षांच्या लहान मुलीने झोपेत अंथरुणात लघुशंका केली. मग त्या मातेचा राग अनावर झाला. त्या सावत्र आईने मग उलाथणे तापवले. त्या लहान मुलीच्या गालावर, ओठावर, तोंडावर, गळ्याजवळ उलाथण्याने चटके दिले. कोल्हापूर शहरातील हातकणंगले तालुक्यातील कासारवाडी येथे हा प्रकार घडला. त्या सावत्र आईविरोधात शिरोली एमआयडीसी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुजा शुभम मगरे असे त्या महिलेचे नाव आहे.
मुळेचे जालनामधील शहापूर धांडेगाव येथील असलेले शुभम मोकिंदराव मगरे कासारवाडी येथे राहतात. त्यांनी पुजा हिच्याशी दुसरे लग्न केले आहे. ते पहिल्या पत्नीचे दोन मुलांसह भाडेकरू म्हणून वास्तव्यास आहेत. शुभम कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यावेळी त्यांची पत्नी पुजा मगरे हिच्याकडे पाच वर्षांच्या मुलगीने होती. त्या मुलीने अंथरुणावरती लघुशंका केली. त्यामुळे पुजा हिला प्रचंड राग आला. तिने संतापात उलाथणे तापवले आणि पाच वर्षांच्या चिमुरड्या मुलीस गालावर, ओठांवर, तोंडावर, गळ्याजवळ, गुप्तांगा जवळ चटके दिले. ही घटना शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास घडली.
शुभम मगरे घरी आल्यावर मुलगी समोर येताच त्यांना तिच्या सर्व अंगावर जखमा दिसल्या. ती सारखी रडत होती. जेव्हा पत्नी पूजा हिने हा अतिशय निंदनीय प्रकार केल्याचे समजले तेव्हा त्यांचा संताप अनावर झाला. पाच वर्षांच्या मुलीची अवस्था बघून त्यांना अश्रू अनावर झाले.
अश्रू पुसत ते मुलीला घेऊन खासगी रुग्णालयात पोहचले. त्या ठिकाणी तिच्यावर उपचार केले. त्यानंतर त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठले. पत्नी पूजा मगरे विरोधात शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी पूजा मगरे हिला अटक केली. शुभम व पुजा या दोघांचे हे दुसरे लग्न आहे. या दोघांनाही पहिल्या लग्नापासून अपत्य आहेत.