जळगाव | 7 फेब्रुवारी 2024 : कल्याणमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून शिवसेना शहरप्रमुखावर पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याची घटना ताजी असताना जळगावातून गोळीबाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. जळगावात भाजपच्या एका माजी नगरसेवकावर अतिशय जीवघेणा असा हल्ला झाला आहे. पाच तरुण हे तोंडाला रुमाल बांधून आले. या पाचही आरोपींच्या हातात पिस्तूल होती. ते भाजपच्या माजी नगरसेवकाच्या कार्यालयात घुसले. त्यांनी माजी नगरसेवकावर गोळीबार केला. त्यानंतर ते तिथून पळून गेले. संबंधित घटनेचा गोळीबाराचा प्रकार कॅमेऱ्यात पूर्णपणे कैद झालेला नाही. पण आरोपी एका कारमधून कसे उतरतात, हातात बंदुका घेऊन कसं माजी नगरसेवकाच्या कार्यालयात शिरतात हे सर्व स्पष्टपणे सीसीटीव्ही कैद झाली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
जळगावच्या चाळीसगावात भाजपच्या माजी नगरसेवकावर गोळीबार करण्यात आला आहे. चाळीसगाव शहरातील हनुमान वाडी या ठिकाणी हा गोळीबार करण्यात आला आहे. माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे हे आपल्या कार्यालयात बसलेले असताना अज्ञात तरुणांनी त्यांच्यावर गोळीबार केला आहे. मोरे यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गोळीबाराचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून चार ते पाच अज्ञात तरुणांनी तोंडाला रुमाल बांधून मोरे त्यांच्यावर गोळीबार केला. पोलीस आरोपींचा शोधात असून शहरात तणावपूर्ण शांतता आहे.
अज्ञात पाच आरोपी हे एका कारमधून आल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. ते एका पाठोपाठ पाच जण हातात बंदुका घेऊन आले. त्यानंतर त्यांनी योग्य संधी साधत मोरे यांच्यावर कार्यालयात प्रवेश केला. त्यांनी मोरेंवर बेछूट गोळीबार केला. त्यानंतर त्यांनी तिथून धूम ठोकली. या गोळीबारात बाळू मोरे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
संबंधित घटनेची माहिती मिळाल्यानंतर चाळीगाव शहर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. सीसीटीव्हीची पाहणी केली. त्यानंतर पोलीस आरोपींच्या शोधात लागले आहेत. आरोपी एका कारने आले होते. ती कार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्यामुळे आरोपी पोलिसांपासून फार लांब पळून जाऊ शकत नाहीत हे स्पष्ट आहे. आरोपींनी हत्येचा प्रयत्न नेमका का केला? ते अद्याप समजू शकलेलं नाही. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.