मुंबई : आर्यन खान प्रकरणामुळे चर्चेत आलेले एनसीबी मुंबईचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या मागे लागलेला दृष्टचक्राचा फेरा कायम आहे. वानखेडे यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यावेळची धमकी फेक ट्विटर अकाऊंटवरून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाने देण्यात आली आहे. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. अशा प्रकारच्या धमक्यांचे सत्र सुरु राहिल्याने वानखेडे यांच्या पत्नी आणि मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी गंभीर भूमिका घेतली आहे. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहोत, असे क्रांती रेडकर यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितले.
समीर वानखेडे हे 2021 पर्यंत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबी मुंबईचे झोनल डायरेक्टर म्हणून कार्यरत होते. या कार्यकाळात त्यांनी कारवायांचा धडाका लावला होता. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यू प्रकरणातील ड्रग्ज अँगल, क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक अशा अनेक हाय-प्रोफाइल बॉलिवूड प्रकरणांचा तपास वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेला आहे. त्यामुळे चर्चेत असलेले वानखेडे यांना आता थेट डी-कंपनीच्या नावाने ठार मारण्याची धमकी देण्यात आल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. पतीला थेट अंडरवर्ल्डची धमकी मिळाल्याने क्रांती रेडकर धास्तावल्या आहेत.
धमक्या देणे, ट्रोल करणे खूप दिवसांपासून सुरू आहे. आतापर्यंत आम्ही त्याकडे दुर्लक्ष करत आलो किंवा आम्ही अशा लोकांना ब्लॉक केले. मात्र दोन दिवसांपासून धमक्यांची मालिका वेगळ्या पद्धतीने सुरू झाली आहे. आता ज्या दोन ट्विटर हँडलवरून धमक्या येत आहेत, त्याचे चित्र वेगळेच दिसत आहे. ते भारतीय ट्विटर हँडल नाहीत, ते आंतरराष्ट्रीय ट्विटर हँडल आहेत. धमक्या देणारे हे लोक भारताचा द्वेष करणारे आहेत. ते आम्हाला दाऊदचे नाव घेऊन धमक्या देत आहेत. आमच्या मुलांची नावे घेत आहेत. ते देशाला शिव्या देत आहेत. केंद्र सरकार आणि समीर वानखेडे यांना शिवीगाळ करत आहेत. उद्या जर आमच्यावर कोणी हल्ला केला, अॅसिड फेकले किंवा अपहरण केले तर त्याला जबाबदार कोण? हा गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे जे घडत आहे, त्याविरोधात आवाज उठवला पाहिजे. त्यामुळे या धमक्यांबाबत आम्ही पोलिसात तक्रार दाखल करणार आहोत, असे क्रांती रेडकर यांनी सांगितले.