अंबरनाथ : सध्या सर्वत्रच शाळांना सुट्टीचे वेध लागले आहेत. मुलांच्या परीक्षा जवळपास संपत आल्या आहेत. त्यामुळे अनेक मुले आता गावी जाऊन सुट्टीचा आनंद लुटण्याचा बेत आखत आहेत. याचदरम्यान ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरात एका शाळेमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. यामागे कारण आहे ते चार शाळकरी मुले गायब होण्याचे. घरातून शाळेत जाण्यासाठी निघालेली चार मुले शाळेत पोहोचलीच नाही. काही वेळ वाट बघितल्यानंतर मुले शाळेत का आली नाहीत, यासाठी शिक्षकाने पालकांना फोन कॉल करुन विचारणा केली. त्यावेळी मुलांनी शाळा गाठण्यासाठी कधीच घर सोडले होते, असे कळताच परिसरात प्रचंड खळबळ उडाली. यानंतर मुलांचा शोध घेण्यासाठी चारही दिशेने शोधाशोध सुरू झाली.
बेपत्ता झालेली मुले 14 ते 15 वर्षे वयोगटातील असून ही सर्व मुले अंबरनाथच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये राहतात. चारही मुले शाळेच्या दिशेने पायी येत असताना गायब झाल्यामुळे परिसरात प्रचंड घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. ठाणे जिल्ह्यात यापूर्वी मुलांचे अपहरण करण्यात आल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्या सर्व पार्श्वभूमीवर बेपत्ता झालेल्या मुलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
संबंधित चार मुलांना अज्ञात लोकांनी पळवून नेले असल्याचाही संशय वर्तविला जात आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी अधिक तपास सुरू केला असून अज्ञात लोकांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा देखील नोंदवला आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 363 अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
शाळकरी मुलांनी शाळेत जाण्यासाठी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास आपले घर सोडले होते. मात्र नंतर ही मुले शाळेत पोहोचली नाहीत. तसेच बराच वेळ उलटून गेल्यानंतर घरीही परतली नाहीत. त्यामुळे पालकांमध्ये प्रचंड चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पालकांनी अंबरनाथ तसेच आसपासच्या परिसरात मुलांचा शोध घेतला, मात्र त्यादरम्यान मुलांबाबत कुठेच थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे अखेर स्थानिक शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये घटनेबाबत फिर्याद नोंद करण्यात आली.