नवरा-बायकोच नातं हे पवित्र मानलं जातं. पत्नी तिच्या आई-वडिलांच घर सोडून मोठ्या विश्वासाने नवऱ्याच्या घरी येते. पत्नीचा आदर, सन्मान ही नवऱ्याची जबाबदारी असते. पण काही अपवाद सुद्धा असतात. पत्नीचा मान-सन्मान सोडा, उलट ते आपली विकृत वासना क्षमवण्यासाठी टोक गाठतात. असचं एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. डॉमिनिक पेलिको नावाच्या व्यक्तीला जवळपास 10 वर्ष पत्नीच मास रेप घडवून आणल्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं आहे. न्यूज एजेंसी रॉयटर्सच्या रिपोर्ट्नुसार डॉमिनिक पत्नीला नशेच औषध देऊन बेशुद्ध करायचा. त्यानंतर अनोळखी माणसांना घरी बोलवून त्यांना पत्नीवर बलात्कार करायला लावायचा. या प्रकरणात न्यायालयाने डॉमिनिकसह 50 जणांना रेप, अटेम्प्ट टू रेप आणि लैंगिक हल्ला प्रकरणात दोषी ठरवलं आहे. फ्रान्सच्या एका न्यायालयाने हा निर्णय दिलाय.
पीड़िता जीजेल पेलिको या डॉमिनिकला होणारी शिक्षा ऐकण्यासाठी खच्चून भरलेल्या कोर्ट रुममध्ये हजर होत्या. त्या म्हणाल्या की, “मी असं मानायची की, मी परफेक्ट मॅरेज रिलेशनमध्ये आहे. पण डॉमिनिकने माझ्यासोबत जे केलं, त्याने मी कोसळून पडली” जीजेल यांनीच न्यायालय आणि मीडियाला त्यांची ओळख उघड करण्याची परवानगी दिली. कारण त्यांना आपली ओळख लपवायची नव्हती. महिलांसमोर उदहारण ठेवायचं होतं. माझ्यासोबत जे झालं, त्याचं व्हिडिओ रेकॉर्डींग जनता आणि मीडियासाठी सार्वजनिक करावं, यासाठी जीजेल यांनी न्यायाधीशांना राजी केलं. कारण त्यामुळे अन्य महिलांना अशा घटनांविरोधात आवाज उठवण्यासाठी प्रेरणा मिळेल.
निकालानंतर जीजेलची पहिली प्रतिक्रिया काय?
फ्रान्सच्या दक्षिणेला असलेल्या एविग्नन शहरातील न्यायालयात तीन महिने सुनावणी चालली. 72 वर्षांची जीजेल रोज या सुनावणीला हजर असायच्या. कोर्टाच्या निर्णयानंतर त्या बाहेर आल्या, त्यावेळी हजारोंच्या जमावाने त्यांचं स्वागत केलं. दोषींना शिक्षा सुनावल्यानंतर जीजेल पहिली प्रतिक्रिया देताना म्हणाल्या की, “ही सुनावणी माझ्यासाठी कठीण परीक्षा होती. सर्वांसमोर सुनावणी घेण्याच्या माझ्या निर्णयावर मला कुठलाही पश्चताप नाहीय. मला विश्वास आहे, आपण सर्व मिळून असं सामूहिक भविष्य बनवू ज्यात प्रत्येक महिला आणि पुरुष सन्मान आणि समजून घेऊन एकत्र राहतील. या लढाईत तुम्ही मला साथ दिली, त्या बद्दल मी तुमचे आभार मानते”
50 वर्षांपूर्वी लग्न झालेल
डॉमिनिक पेलिकोची जीजेलसोबत 50 वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. डॉमिनिकने कोर्टात त्याच्यावरील सर्व आरोप स्वीकारले. पाच न्यायाधीशांच्या पीठाने त्याला 20 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. न्यायालयाने अन्य 46 जणांना बलात्कार प्रकरणात दोषी धरलं. दोघांना बलात्काराचा प्रयत्न आणि दोघांना लैंगिक शोषण प्रकरणात दोषी ठरवलं. त्या सर्वांना 3 ते 15 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. सर्व दोषींकडे कोर्टाच्या निर्णयाविरोधात वरच्या न्यायालयात अपील करण्यासाठी 10 दिवस आहेत.
बचावासाठी गुन्हेगाराकडून ‘सेक्स गेम’चा आरोप
सुनावणी दरम्यान अनेक आरोपींनी त्यांच्यावर लावलेले आरोप फेटाळले. त्यांनी सांगितलं की, हे जोडपं परस्पर सहमतीने असे ‘सेक्स गेम’ ठेवायचे. त्यांनी बचावासाठी युक्तीवाद करताना सांगितलं की, नवऱ्याने सहमती दिलेली म्हणून हा बलात्कार होऊ शकत नाही.
हे सगळं प्रकरण कसं बाहेर आलं?
डॉमिनिक पेलिको दक्षिण फ्रान्समध्ये माजान नावाच्या एका छोट्याशा शहरात पत्नी जीजेल सोबत रहायचा. तो वीज कंपनीचा कर्मचारी होता. जीजेला एका मल्टीनॅशनल कंपनीत मॅनेजर होती. 1973 मध्ये दोघांच लग्न झालं. त्यांना तीन मुलं आहेत. डॉमिनिकला माजानच्या एका सुपरमार्केटमध्ये 12 सप्टेंबर 2020 रोजी महिलांचा अश्लील व्हिडिओ बनवताना पकडलं. पोलिसांना त्याच्या मोबाइलच्या तपासात अनेक महिलांचे अश्लील व्हिडिओ मिळाले. पोलिसांनी डॉमिनिकच्या घरावर छापा टाकला. त्यावेळी दोन फोन, एक कॅमरा, एक व्हिडिओ रेकॉर्डर आणि लॅपटॉप जप्त केला. पोलिसांनी डॉमिनिकच्या लॅपटॉपमध्ये 20 हजारपेक्षा जास्त अश्लील व्हिडिओ आणि फोटो सापडले. ते ‘अब्यूस्ड’, ‘हर रेपिस्ट’ आणि ‘नाइट अलोन’ नावाच्या फोल्डरमध्ये सेव्ह केलेले होते.
आरोपींना कसं पकडलं?
पोलिसांनी 2 नोव्हेंबर 2020 रोजी डॉमिनिकच्या पत्नीला जीजेलला बोलावलं. पतीच्या लॅपटॉपमधील तिचे व्हिडिओ आणि फोटो दाखवले. नशेच्या अमलाखाली बेशुद्धा असलेल्या जीजेलवर 72 वेगवेगळ्या पुरुषांनी बलात्कार केला होता. पोलिसांनी डॉमिनिकच्या फोन कॉल, स्काइप, व्हाट्सएपमधून मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे 50 आरोपींना अटक केली.
मुलगी, सुनांचे अश्लील फोटो
डॉमिनिकने पोलीस चौकशीत कबूल केलं की, त्याने पत्नी जीजेलला 2011 पासून नशेच औषध द्यायला सुरुवात केली. जेवणात तो नशेचा पदार्थ मिसळायचा. जीजेलला नंतर कळलं की, ती दिवस-दिवसभर झोपून राहते. तिला लक्षातही नसायचं की, आदल्या संध्याकाळी काय झालं. जीजेलला वाटलं की, तिला अल्जायमरचा आजार झालाय. डॉमिनिक असं करुन अनोळखी माणसांना पत्नीवर बलात्कार करायला लावायचा. त्याच व्हिडिओ शूटिंग केलं त्याने. पोलिसांना डॉमिनिकच्या घरातील गॅरेजमध्ये एक पेन ड्राइव्ह मिळाला. त्यात त्याने मुलगी केरोलिन आणि दोन्ही सुनांचे अश्लील फोटो होते. जीजेलने 2020 साली डॉमिनिकला घटस्फोट दिला.
स्प्लिट पर्सनॅलिटीचा बळी
डॉमिनिक स्प्लिट पर्सनॅलिटीचा बळी आहे. त्याच्या शरीरात दोन माणसं वास्तव्य करतात. एक गुन्हेगारी प्रवृत्तीचा आणि दुसरा फॅमिली मॅन. डॉ. लॉरेंट यांच्यानुसार डॉमिनिकला फ्रान्सच्या ग्रामीण भागात सायकल चालवायला आवडतं. तो आपल्या नातवंडांना फुटबॉल मॅच दाखवायला घेऊन जातो. त्याने असं काही करणं हा त्याच्या कुटुंबासाठी मोठा धक्का आहे.