नाशिकः फरार असणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या बेनामी मालमत्ता प्रकरणात कळीची भूमिका बजावणाऱ्या संजय पुनमियाने अटक टाळण्यासाठी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेत जामिनासाठी अर्ज दिला आहे. त्यावर न्यायालय काय निर्णय घेणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
नाशिक ग्रामीण पोलिसांनी पुनमियाची पोलीस कोठडी मिळावी यासाठी न्यायालयाकडे विनंती केली आहे. विशेष म्हणजे न्यायालयाने ती मान्य केली आहे. त्यामुळे नाशिक पोलिसांनी मुंबई पोलिसांशी संपर्क साधत कोठडी देण्याची विनंती केली होती. पुनमिया सध्या दुसऱ्या एका प्रकरणात मुंबईत पोलिसांच्या न्यायालयीन कोठडीत आहे. ही कोठडी संपताच त्याला नाशिक ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्याची तयारी सुरू आहे. हे पाहता पुनमियाने जामिनासाठी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. यावर गुरुवारी (21 ऑक्टोबर) सुनावणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे पुनमियाविरुद्ध हा बारावा गुन्हा दाखल आहे. यापूर्वी त्याच्याविरोधात मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात खंडणी वसुलीसाठी धमकावणे, खंडणी गोळा करणे, फसवणूक असे विविध गुन्हे दाखल आहेत.
पुनमिया सध्या फरार असणारे आणि मुंबईचे वादग्रस्त ठरलेले माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जातो. पुनमिया ठाणे जिल्ह्यातला रहिवासी आहे. त्याने सिन्नर तालुक्यात अनेक मालमत्तांची खरेदी केली असून, त्यात धारणगाव, मिरगाव, पाथरे येथे कोट्यवधींची जमीन खरेदी केल्याचे समोर आले आहे. ही जमीन पुनमियाने आपला मुलगा सनीच्या नावावरही खरेदी केली. त्यासाठी शेतकरी असल्याचे बनावट पुरावे जोडले. हे सारे सिन्नरच्या दुय्यम निबंध कार्यालयात बिनाबोभाट पार पडले. याचे कारण म्हणजे पुनमियाच्या डोक्यावर असलेला परमबीर सिंहाचा वरदहस्त असल्याची चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे पुनमिया पिता-पुत्रांच्या नावाचा वापर करून परमबीर सिंहांनीच ही जमीन खरेदी केल्याची चर्चा सुरू आहे. त्या अनुषंगाने आता सिन्नरमध्ये एक तक्रारही दाखल झाली आहे.
पुनमियाने जमीन खरेदीसाठी उत्तन (ठाणे) येथील खरेदी खताची कागदपत्रे जोडली होती. तीच त्याच्यासाठी अडचणीची ठरली आहेत. यातल्या पहिल्या कागदपत्रांची तपासणी केली. तेव्हा त्यात बाबुलाल अग्रवाल आणि त्यांच्या भावाचा सातबारा जोडल्याचे निदर्शनास आले. दुसऱ्या कागदपत्रांचा तहसीलदार राजेंद्र चव्हाण यांनी तपास केला. तेव्हा त्या जमिनीचा मालकही पुनमिया नसल्याचे स्पष्ट झाले. एकंदर पुनुमियाने स्वतः बनावट कागदपत्रे सादर करून येथील जमीन खरेदी केल्याची प्राथमिकदृष्या समोर येत आहे.
विशेष म्हणजे या साऱ्या प्रकरणाची तक्रार आता सिन्नर पोलीस ठाण्यात दाखल आहे. नाशिक जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी या साऱ्या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, मुंबई पोलिसांची कस्टडी संपताच पुनमियाला ताब्यात घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. सचिन पाटील यांची ओळख एक कडक आणि खमक्या पोलीस अधिकारी अशी ओळख आहे. त्यांच्या बदलीसाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवले होते. एका आमदाराने त्यासाठी दबाव लावला होता, अशी चर्चा होती. त्यांच्या बदलीचे आदेशही आले होते. मात्र, नागरिकांचा वाढता रोष आणि हे प्रकरण मॅटमध्ये गेल्याने सध्या सचिन पाटीलच पोलीस अधीक्षकपदी आहेत.
इतर बातम्याः
हिंदू ही एकच जात, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह भैय्याजी जोशी यांचा लासलगावमध्ये दावा
हिंदू ही एकच जात, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह भैय्याजी जोशी यांचा लासलगावमध्ये दावाhttps://t.co/kxM2VHqafq#RashtriyaSwayamsevakSangh|#BhaiyajiJoshi|#RSS|#Hindu|#Lasalgaon|#Nashik
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 15, 2021