दिल्लीकरांमध्ये एक वेगळीच दहशत निर्माण झाली आहे. दिल्लीत एका नव्या गँगचा उदय झाला आहे. त्यामुळे दिल्लीकरांना मनमोकळेपणं फिरणंही कठिण झालं आहे. गळा घोटणारी गँग म्हणून ही गँग प्रसिद्ध आहे. दिल्लीच्या काही भागातील या गँगचे गुन्हे उघडकीस आले आहेत. या टोळीतील गुंड लोकांना रात्रीच्या अंधारात सुनसान जागेवर गाठतात. मागून येऊन लोकांचा गळा दाबतात आणि त्यांच्यावर हल्ला करतात. त्यानंतर या लोकांकडील पैसे आणि दागिने लुटून पळून जातात. दिल्लीच्या महावीर एनक्लेव्ह परिसरात एका व्यक्तीला अशाच प्रकारे लुटण्यात आलं. या व्यक्तीकडचे 400 रुपयेही गुंडांनी सोडले नाहीत.
गळा घोटणाऱ्या या गँगचे कारनामे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. पोलिसांनी या आधारे गँगच्या तीन सदस्यांना अटक केली आहे. दिल्लीत ही गळा घोटणारी गँग अजूनही सक्रिय असल्याचा पोलिसांना अंदाज आहे. पकडण्यात आलेल्या आरोपीकडून पोलीस कसून चौकशी करत आहेत. यात दोन अल्पवयीन मुले आहेत. त्यांचे कारनामे ऐकून पोलीसही हैराण झाले आहेत. यापूर्वीही अशा घटना घडल्यात का? याची पोलीस कसून चौकशी करत आहेत.
गळा दाबून लोकांना लुटणाऱ्या या गँगच्या सदस्यांपैकी रोशन वय 19, दीपू कुमार वय 23 आणि कृष्ण कुमार वय 23 यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांना गुन्ह्याच्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले. त्यानंतर पोलिसांनी त्याची तपासणी केली. गुन्हा दाखल करून व्हिडीओ पाहून पोलिसांनी आरोपींची ओळख पटवत एकाला अटक केली. त्यानंतर आणखी दोघांना पकडले. सर्वांची पोलीस कसून तपासणी करत आहेत. मात्र, घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक दहशतीखाली आले आहेत. रात्रीच्यावेळी घडणाऱ्या अशा घटनांमुळे पोलीस चांगलेच त्रस्त झाले आहेत.
सर्वात आधी गळा घोटणाऱ्या गँगचे मेंबर एखादा परिसर निवडायचे
रात्री जो परिसर सुनसान होतो, असा परिसरच ही गँग निवडायची
त्यानंतर गँगचे लोक रेकी करायचे
गुन्हा केल्यानंतर कुठून आणि कसं पळायचं याचे मार्ग शोधून ठेवायचे
रात्री अंधारात हे लोक दबा धरून बसायचे, शिकार येण्याची वाट पाहायचे
एखादा व्यक्ती एकटा येताना दिसला तर त्याच्यावर ते हल्ला करायचे
गँगचा एक सदस्य त्या व्यक्तीचा गळा घोटायचा
बाकीचे लोक त्याच्याकडील सर्व सामान पळवून न्यायचे
ज्या ठिकाणी अंधार असेल, रस्ते सुनसान असतील, वर्दळ नसेल अशा ठिकाणीच हे आरोपी गुन्हा करायचे. त्यामुळे त्यांना पकडणं कठीण असायचं.